स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कामाकडे आपण स्वतंत्रपणे पाहातो ते बरोबर नाही, भारताच्या क्रांतियुद्धाकडे जर मंदिर म्हणून पाहिले, तर असे लक्षात येईल की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या मंदिराचा पाया घातला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कळस ठेवला होता. या पद्धतीनेही इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी तसेच आयसीएचआरने लक्ष देऊन अभ्यास करायला हवा, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५७व्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने अंदमानात पोर्ट ब्लेअर येथे ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नेताजी सुभाष चंद्र बोस: फ्रीडम स्ट्रगल एंड भारतीय नॅशनॅलिज्म’ या तीन दिवसीय परिसंवादाचे अंदमान येथे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या हस्ते याचे उद््घाटन करण्यात आले होते. परिसंवादाला विविध इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम इंडिया काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च आणि अखिल भारतीय इतिहास संकलन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. परिसंवादासाठी डॉ. उमेश कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि कार्यवाह राजेंद्र वराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात रणजित सावरकर पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्ययुद्धाकडे पाहाताना मौलाना आझाद यांनी प्रत्येक क्रांतिकारक वा स्वातंत्र्यसैनिक यांच्याकडे स्वतंत्रपणे वेगवेगळे घटक म्हणून पाहिले. मुळात या सर्व व्यक्ती या एका माळेशीच गुंफलेल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत संघटनेचा पाया घातला, ती संघटना बांधून प्रथम क्रांतिकार्याला आणि भारतीय क्रांतिकार्यालाही जगात नेले, अंदमानात तुरुंगात असतानाही त्यांनी क्रांतिकारी कार्य सुरू ठेवले होते. १९१७ मध्ये ब्रिटश गुप्तचरांच्या एका अहवालानुसार विविध माहिती या संबंधात मिळू शकेल. ब्रिटिशांनी हा अहवाल दाबून ठेवला होता. ब्रिटिशांचा या प्रकारच्या अहवालाकडे पाहाण्याचा धूर्त आणि अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन होता, असेही वीर सावरकर यांनी सांगितले.
‘पोलिटिकल ट्रबल इन इंडिया – फ्रॉम १९०७ टू १९१७’ या नावाने ब्रिटिश गुप्तचरांनी हा अहवाल तयार केला आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे. जो ब्रिटिशांनी दडपून ठेवला होता. ब्रिटिश अशा प्रकारच्या इतिहासाकडे पाहात, ते पुढील कारवाया टाळता कशा येतील यादृष्टीने ते पाहात असत. वैयक्तिक स्तरावर नव्हे तर त्याचा या पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे, असे त्यांचे आवाहनही यावेळी इतिहास संशोधक आणि इतिहासाच्या अभ्यासकांना रणजित सावरकर यांनी केले.
ब्रिटिशांना भारतातून जाण्यास भाग पाडले
केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी सांगितले की, ज्यांनी मातृभूमीसाठी योगदान दिले त्या व्यक्ती, संस्था आणि लेखकांना लोकांसमोर आणणे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यामागील उद्देश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भारताच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आणि इंग्रजांना भारत सोडण्यास भाग पाडले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर या भारतमातेच्या दोन सुपुत्रांचे अंदमानाशी विशेष नाते आहे. वीर सावरकर यांनी मातृभूमीसाठी अंदमान जेलमध्ये यातना भोगल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच अंदमान द्वीप ब्रिटिश आणि जपानी सैन्याच्या विळख्यातून सोडवले आणि ३० डिसेंबर १९४३ रोजी या अंदमान द्वीपवर झेंडा फडकावला.
Join Our WhatsApp Community