Veer Savarkar : सावरकरांच्या संकल्पनेतील राजकारण…

157
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

आपण अभिमानाने सांगतो की भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. मात्र १९४७ (तसे पाहता १९२५-३० नंतर) नंतर भारताच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतले. पूर्वी राजेशाही असताना एक राज्य दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचे आणि ते राज्य बळकवायचे. त्या राज्यकर्त्यांच्या मनात परस्परांविषयी जितका द्वेष नसेल त्याहून अधिक द्वेष या आधुनिक लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष करु लागले आहेत. आमदार एकमेकांवर हात उचलू लागले, कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करु लागले, एकमेकांचे वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणू लागले आहेत. या सर्व गोष्टी पाहता सावरकरांच्या राजकारणाची आठवण येते.

सावरकर विरोधकांना शत्रू मानत नसत तर ते त्यांना प्रतिस्पर्धी मानत. आपण एखाद्या स्पर्धेत उतरतो तेव्हा स्पर्धा सुरु असताना आपण छान झुंज देतो मात्र स्पर्धा संपल्यावर आपण मित्रच असतो. सावरकर म्हणतात, ‘राजकारणाच्या व्यवहाराचे आणि शासनशास्त्राचे उच्चतम ध्येय सर्व मनुष्यजातीस समसमान अधिकार असणाऱ्या एका प्रातिनिधिक शासनाचे नागरिक बनविणे हे होय.’ राजकारण करत असताना सहकार आणि असहकार या गोष्टींचा अवलंब करावा लागतो. मात्र सहकार केव्हा करावा आणि असहकार केव्हा करावा याचे भान उत्तम राजकारण्याला असले पाहिजे.’

तसे पाहता खरे राजकारण म्हणजे सहकार नव्हे किंवा असहकारही नव्हे. सावरकरांचे म्हणणे होते की सहकाराने प्रश्न सुटत असेल तर विपक्षाशी सहकार करायला मुळीच हरकत नाही आणि जर सहकार कामी येत नसेल तर अवश्य असहकार करावा. पण काही राजकारण्यांप्रमाणे असहकार हेच आपल्या राजकारणाचे तत्व करुन घेऊ नये. असहकार हा एक प्रयोग आहे, तत्कालिक उपाय आहे असे सावरकर मानायचे. सावरकर म्हणतात, ‘सर्व मनुष्यमात्रांनी सहकार करावा हेच खरे ध्येय होय. आणि तो सहकार परस्परांनी परस्परांच्या हितास अनुकूल असा करावा किंवा करणे भाग पडले जावे अशाच स्वरुपाचा राहणारा असल्याने त्यासच प्रतिसहकार किंवा प्रतियोग म्हणतात.’

(हेही वाचा Amrut Bharat station scheme : महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट?)

कुलवंश-जात-देश-भाषा या सर्व भिन्नत्वाचे क्षुद्र अभिमान आणि अहंकार त्यागून मनुष्यजातीचे राजकीय सात्वित एकीकरण करावे असे सावरकरांचे मत होते. राजकारण्यांनी कसे वागावे असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. सावरकरांचे म्हणणे स्पष्ट होते की केवळ ज्ञान लंगडे आणि नुसते कर्म आंधळे. म्हणून राजकीय नेत्यांची ज्ञानयुक्त कर्म केले पाहिजेत. कोणत्याही विचारांचा अभ्यास करताना केवळ एकाच विचारांची पुस्तके वाचून मत बनवणे सावरकरांना पटत नाही. सर्व विचारांचा अभ्यास करुन एका पक्षाचा पुरस्कर्ता होणे कधीही श्रेयस्कर.

विपक्षावर केवळ टीकाच करावी का? त्यांना नेहमीच धारेवर धरायचे का? तर असे नाही. अजातशत्रू होण्याच्या नादात विपक्षाची पोकळ बढाई मारली तर स्व-पक्षाचे नुकसान होऊ शकते आणि विपक्ष हा दुष्ट असतो असा समजही घातक ठरतो. आज राजकारण करताना सर्व पक्षांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सर्व पक्षांनी मिळून भारताला सर्वोच्च पदावर न्यायचे आहे, भारतात मानवी मूल्ये टिकवून ठेवायची आहेत. अशी धारणा राजकीय पक्षांनी ठेवली नाही तर देशाचे कल्याण होणार नाही. टूलकीट व बाह्य शक्तीच्या आधारावर देशात अस्थिरता माजवणे, आंदोलनाच्या नावाखाली दंगली घडवून आणणे अशी कृत्ये करणारा विरोधी पक्ष हा मानवी मूल्ये जपण्यास आणि देश एकसंध ठेवण्यास घातक ठरु शकतो.
तसेच देशातील तरुणांनी राजकारणात रुची दाखवली पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने निवडणूक लढवावी असा नाही. तर हिंदू म्हणून तरुणांच्या मागण्या असल्या पाहिजेत. तरुणांना राजकीय आणि सामाजिक पटलावरील इत्यंभूत माहिती असायला हवी. राजकीयदृष्ट्या त्यांची स्वतःची अभ्यासू मते असायला हवीत. सामाजिक कार्यात त्यांचा वावर असायला हवा. सावरकर राजकीय दृष्टीकोनातून तरुण देशबंधूंना उद्देशून म्हणतात, ‘माझ्या तरुण देशबंधूंनी राजकारणातील अंतिम सत्ये व महत्‌ सिद्धांत शिकावे अशी माझी उत्कट उच्छा आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.