…तर ठाकरे किंवा संजय राऊतांनी, राहुल गांधींच्या फोटोला चप्पलने मारून दाखवावे; बावनकुळेंचे आव्हान

155

काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपतर्फे आगामी 30 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान राज्यभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीने राहुल गांधींना जाब विचारला नाही म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

( हेही वाचा : गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका; दोन वर्षांसाठी वकिलीची सनद रद्द)

उद्धव ठाकरे नौटंकीबाज

उद्धव ठाकरे यांनी स्वतःची आणि आपल्या मुलाची खुर्ची वाचवण्यासाठी सावरकरांचा अपमान सहन केला. राहुल गांधी सावरकर यांच्याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे ठोस भूमिका घेऊन काँग्रेसचा हात का सोडत नाहीत ? बाळासाहेबांनी हे सहन केले नसते. उद्धव ठाकरे मिंधे का झाले ? त्यांना परत मुख्यमंत्रीपद हवे आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. ते नौटंकीबाज आहे. संजय राऊत हे तर सकाळचा भोंगा आहे. अडीच वर्षात राहुल गांधींना जाब का विचारला नाही, असा सवाल बावनकुळे यांनी केला. जर शिवसेना ढोंगी नसेल तर ठाकरे किंवा राऊत यांनी राहुल गांधींच्या फोटोला चप्पल मारून दाखवावी असे आव्हान बावनकुळे यांनी यावेळी दिले.

राज्यभरात सावरकर गौरव यात्रा

याबाबत नागपुरात बावनकुळे म्हणाले की, आम्ही या मुद्द्यावर जशास तसे उत्तर देऊ. भाजप राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. आगामी 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये यात्रा निघणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गटाचे आमदारदेखील सहभागी होणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राहुल गांधी एक तासदेखील काळ्या पाण्याची शिक्षा भोगू शकत नाहीत. राहुल गांधी यांची सावरकर यांच्यासमोर काहीच पात्रता नाही. नाना पटोले, राहुल गांधी कुणावर टीका करत आहे याचे भान त्यांना राहिलेले नाही. वीर सावरकरांचा इतिहास पुसण्याचे काम काँग्रेस नेते करत असून आम्ही नेमका इतिहास नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊ. एक कोटी लोक यात सहभागी होणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.