Veer Savarkar : सावरकर प्रेमी निर्माण करणारे ’स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर’

232
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) सबंध जीवन प्रेम या शब्दावर आधारित आहे. देशप्रेम हा सावरकरांच्या चरित्राचा गाभा आहे. सावरकर मानवजातीला प्रेम करण्याचे संस्कार देतात. मग सावरकरांच्या अनुयायांना सावरकर प्रेमी का म्हणू नये? स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर असेच सावरकर प्रेमी निर्माण करण्याचा प्रयत्न गेली ३० वर्षे करीत आहे. देशप्रेम, विज्ञाननिष्ठा, ऐतिहासिक व सामाजिक दृष्टीकोन, कवी, लेखक, पत्रकार सावरकर अशा सावरकरांच्या विविध गुणांचा परिचर अनेक कार्यक्रम आयोजित करुन आणि व्याख्यानाद्वारे हे मंडळ करुन देत आहे. या मंडळाचे उल्लेखनीय कार्य म्हणजे १०० दिवस रथयात्रा काढून गावागावात सावरकरांचे विचार पोहोचवण्याचे कार्य सातत्याने केले जात आहे. सावरकरांनी जगन्नाथाचा रथोत्सव ही कविता लिहिली होती. त्याचप्रमाणे सावरकरांचा रथोत्सव आयोजित करुन या मंडळाने जणू सतीचे वाण हाती घेतले आहे.
सावरकरांवर (Veer Savarkar) बालपणीच देशभक्तीचे संस्कार झाले. म्हणूनच सावरकर संस्कारित पिढी घडवायची असेल तर लहान मुलांना सावरकर कळले पाहिजे. हा उद्देश समोर ठेवून मंडळाने बालगोपाळांसाठी छोट्या पुस्तिका तयार केल्या आहेत. हे मंडळ लंडन, मॉरिशय, जपान, अंदमान, छत्रपती संभाजी नगर, भगूर, इंदूर, पुणे इत्यादी ठिकाणी स्वा. सावरकर साहित्य संमेलने देश-विदेशांत भरवून सावरकरांचा वारसा नव्या पिढीला देण्याचा प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत एकूण १४ संमेलने झाली असून यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. उदा. व्याख्याने, परिसंवाद, संगीत रजनी. इ.
सावरकर (Veer Savarkar) हे उत्तम कलाकार होते. सावरकरी जागर करायचा असेल तर कलेशिवाय दुसरे चांगले माध्यम नाही. स्वा. सावरकर कलामंच माजलगाव च्या तरुणांनी ’अनादी मी अनंद मी’ या संगीतमय कार्यक्रम बसवला असून हा संगीतमय कार्यक्रम मंडळातर्फे सादर केला जातो. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना मंडाळाच्या कार्याध्यक्षा स्नेहल पाठक यांची आहे. मृत्युंजय या नाटकाचे ६ प्रयोगही या मंडळातर्फे केले गेले आहेत. तसेच बदलत्या युगाची हाक ऐकून ऑनलाईन व्याख्यानेही आयोजित केली जातात. नांदेड जिल्ह्यातील सघोडी येथे असलेल्या सैनिक विद्यालय येथील स्विमिंग टॅंकचे स्वा. सावरकर जलतरणिका असे नामकरण करुन विद्यार्थ्यांना सावरकरांचं चरित्र सांगण्याचं कामही मंडळाने केलेलं आहे.
अंदामन हे राष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राविषयी लोकांना माहिती देण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर यांच्या पुढाकाराने अंदामान यात्राचे आयोजन करण्यात येते. आतापार्यंत १२ वेळा अशी यात्रा आयोजित करुन सावरकरांचा अंदमानातील इतिहास लोकमानसावर रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील चांगलं काम करणांर्‍याचे कौतुकही अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणूनच मंडळाच्या वतीने स्वा. सावरकर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते आणि लेखक, साहित्यिक, समाज सेवक अशा विविध स्तरातील राष्ट्रभक्त मंडळींचा सत्कार केला जातो. सावरकरांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावण्यात यावी यासाठी अध्यक्ष भाऊ सुरडकर यांच्या तर्फे यशस्वी प्रयत्न करण्यात आले आहे.
सावरकरांवर (Veer Savarkar) पीएचडी करणार्‍या व्यक्तींचा शोध घेऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतो. वरळीच्या प्राध्यापिका मनिषा रोकडे यांनी सावरकरांवर पीएचडी केलेली आहे. त्यांचाही सन्मान मंडळाने केलेला आहे. विविध माध्यमातून सावरकर प्रेमी निर्माण करण्याचा आणि त्यांचा शोध घेण्याचं काम ’स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ, छत्रपती संभाजी नगर’ करत आहे. देश सावरकरमय झाला तर या देशाकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, याची जाण मंडळाला आहे. भाऊ सुरडकर, स्नेहल पाठक, सुभाष कुमावत, किरण सराफ, विजय जहागीरदार, प्रमोद सरकटे असे मान्यवर पदाधिकारी या मंडळाची धुरा सांभाळत आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांची त्यांना साथ लाभत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.