Veer Savarkar यांच्या मानहानीचा राहुल गांधींविरुद्धचा खटला पुण्यातील विशेष न्यायालयात वर्ग

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी 5 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये सावरकरांविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील रायबरेलीचे खासदार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली.

33

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेला खटला पुण्यातील खासदार आणि आमदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी 5 मार्च 2023 रोजी लंडनमध्ये सावरकरांविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याबद्दल उत्तर प्रदेशातील रायबरेलीचे खासदार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध पुण्यातील दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.

न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग (जेएमएफसी) अक्षी जैन यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. 21 सप्टेंबर रोजी, हे प्रकरण दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरित करण्यात आले, जे खासदार आणि आमदारांवरील फौजदारी खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालय म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती सात्यकी सावरकर यांचे वकीलपत्र घेतलेले वकील संग्राम कोल्हटकर यांनी दिली. सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या तक्रारीसोबत काही बातम्यांचे अहवाल तसेच राहुल गांधींच्या लंडनमधील भाषणाच्या व्हिडिओची युट्यूब लिंक पुरावा म्हणून सादर केली. सात्यकी यांच्या म्हणण्यानुसार, गांधींनी लंडनमध्ये सांगितले होते की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Veer Savarkar) एक पुस्तक लिहिले होते ज्यात त्यांनी असे म्हटले की, ते आणि त्यांचे पाच किंवा सहा मित्र एका मुसलमानाला मारहाण होत असताना पाहताना आनंदीत होत होते. “हे भ्याड कृत्य नाही का, असा सवाल राहुल गांधींनी यावेळी केला होता.

(हेही वाचा Veer Savarkar यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने सांगितले…)

पुण्याच्या न्यायालयात मानहानीचा खटला दाखल

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्याबाबत राहुल गांधींनी दावा केल्याप्रमाणे असे कोणतेही पुस्तक लिहिलेले नाही, किंवा अशी घटनाही घडलेली नाही. त्यामुळे मी राहुल गांधींविरुद्ध पुण्याच्या न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे, असे सात्यकी सावरकर म्हणाले. सात्यकी यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, “राहुल गांधी यांनी  वीर सावरकर यांच्यावर हेतुपुरस्सर खोटेनाटे आरोप केले आहेत, हे आरोप असत्य असल्याचे पूर्णपणे माहित असूनही प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या आणि सावरकर यांच्या आडनावाची बदनामी करण्याच्या विशिष्ट हेतूने हे आरोप करण्यात आले आहेत.

 जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी 

आपल्या फौजदारी मानहानीच्या अर्जात, सात्यकी सावरकर यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. सात्यकी आणि दोन साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर, JMFC न्यायालयाने जानेवारी 2024 मध्ये पुणे शहर पोलिसांना CRPCच्या कलम 202च्या तरतुदींनुसार तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांनी 27 मे रोजी JMFC अक्षी जैन यांच्यासमोर चौकशी अहवाल सादर केला, ज्यामध्ये गांधींनी मार्च 2023 मध्ये “लंडनमधील भारतीय डायस्पोरा”समोर केलेल्या भाषणात वीर सावरकरांची बदनामी केली होती, असे म्हटले. न्यायदंडाधिकारी यांनी 30 मे 2024 रोजी राहुल गांधींना 19 ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले. परंतु गांधी यांना समन्स प्राप्त झाले नाही आणि त्यामुळे ते न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर हे प्रकरण ४ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.