केंद्राकडून आलेले व्हेंटिलेटर्स निघाले नादुरुस्त! 

केंद्रामार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या व्हेंटिलेटर्सचा मोठा घोटाळा असून त्याची राज्यस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

112

पीएमकेअर फंडातून पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्समध्ये मोठा घोटाळा दिसून येत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला पुरवण्यात आलेले व्हेंटिलेटर्स हे पूर्णतः निरुपयोगी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद यांनी नेमलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीला आढळले आहे. त्यांच्या अहवालानुसार कंपनी तंत्रज्ञदेखील हे दुरुस्त करू शकले नाहीत. हा मोठा घोटाळा असून केंद्रामार्फत महाराष्ट्राला पुरवलेल्या सर्व व्हेंटिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

ही तर अक्षम्य चूक!   

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, पीएम केअर फंडाच्या माध्यमातून वाया गेलेला वेळ व जनतेचा पैसा ही अक्षम्य चूक आहे. मोदी सरकारने देशातील सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यासाठी भाग पाडले. या फंडाबाबत माहितीही दिली नाही किंवा माहितीचा अधिकार लागू केला नाही. पण आता अशा अत्यंत तकलादू व फालतू कंपन्यांना हे कंत्राट कसे आणि का मिळाले, हे जनतेला समजलेच पाहिजे. मानवतेकरिता या सर्वात मोठ्या संकटात घोटाळा सोडा पण नफेखोरीचा विचार करणेही अमानुष आहे.

(हेही वाचा : ‘या’ कारणांमुळे मुंबईत लसीकरणाचा सावळागोंधळ! )

मोदी सरकारचा जनतेच्या जीवाशी खेळ!   

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाला दिलेल्या व्हेंटिलेटर्सप्रमाणे मागील आठवड्यात नाशिकला दिलेल्या व्हेंटिलेटर्समध्येही असाच घोटाळा समोर आला आहे. पीएम केअर फंडातून नाशिक महानगरपालिकेला केंद्र शासनाने व्हेंटिलेटर्स पुरवल्याचा भाजपकडून मोठा गाजावाजा केला होता, परंतु तब्बल ६० व्हेंटिलेटर्स अर्धवट स्थितीत होते, त्याचे सुटे भाग न मिळाल्यामुळे इन्स्टॉलेशन थांबले, तसेच जून महिन्यात पीएम केअर फंडातून पाठविण्यात आलेल्या ३५ व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स अजूनही नादुरूस्त असून संबंधित कंपनीकडून या यंत्राचे सुटे भाग प्राप्त न झाल्याने हे व्हेंटिलेटर्स वापराविना पडून आहेत. नाशिक, औरंगाबादप्रमाणे राज्यातील इतर रुग्णालयांना पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटर्सच्याबाबतीही अशाच तक्रारी आल्या आहेत. मोदी सरकारने हा जनतेच्या जीवाशी खेळ चालवला आहे. मोदी सरकारच्या मनमानी कारभारामुळे कोरोना महामारीत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सअभावी हजारो लोकांचे जीव गेले, परंतु त्यातून मोदी सरकारने काही बोध घेतल्याचे दिसत नाही. देशातील जनतेला रामभरोसे सोडण्यात आल्याचे एकंदर चित्र दिसत आहे, असे सावंत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.