खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळ चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली. यावेळी भाजप आणि शिवसेना यांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेनेचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनीही संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी सभागृहात निर्माण झालेल्या गोंधळामुळे तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी विधानसभेचे कामकाज प्रथम १०, त्यानंतर २० मिनिटे आणि त्यानंतर ३० मिनिटे असे एकूण एक तासासाठी तहकूब करण्यात आले.
( हेही वाचा: राऊतांनंतर आता भरत गोगावलेंनी सभागृहातच वापरला ‘तो’ आक्षेपार्ह शब्द; विरोधक भडकले )
काय म्हणाले होते संजय राऊत?
महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर चोर मंडळ, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बनावट शिवसेनेने पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असेही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितले आहे. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रे दाखवावीत, असे आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.
संसदेत पक्षनेतेपदावरुन काढून टाकण्यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, टाकू द्या, बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट. चोरांचे मंडळ, विधीमंडळ नाही चोर मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरुन काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. अशी अनेक पदे आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिली. जी आम्ही ओवाळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही. पदे गेली तरी परत येतील, आमचा पक्ष महत्त्वाचा आहे.
Join Our WhatsApp Community