तालिबान्यांचे अमानुष कृत्य : नागरिकाला हेलिकॉप्टरला लटकावून काढली धिंड!

तालिबान्यांनी अमेरिकेच्या ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरला ज्या नागरिकाला लटकावले , ती व्यक्ती कोण होती, हे अद्याप जाहीर झाले नाही.

अफगाणिस्तानातून अमेरिकेने सगळे सैन्य माघारी घेताच त्याच दिवशी तालिबान्यांनी काबूलमध्ये अक्षरशः हैदोस घालायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून तालिबान्यांनी चक्क एका नागरिकाला हेलिकॉप्टरला लटकावून त्याची हवेतच धिंड काढली. त्यामुळे तालिबानी जरी ‘आम्ही अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करत आहोत’, असे जगाला ओरडून सांगत असले, तरी हे किती धादांत खोटे आहे, याचा प्रत्यय या प्रसंगावरून आला आहे.
दरम्यान तालिबान्यांनी अमेरिकेच्या ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरला ज्या नागरिकाला लटकावले , ती व्यक्ती कोण होती, हे अद्याप जाहीर झाले नाही. तसेच त्या व्यक्तीला का लटकवण्यात आले? अथवा त्या व्यक्तीला हवेतच हेलिकॉप्टरला लटकावून फाशी देऊन ठार करण्यात आले का? याबाबतही सुस्पष्टता करण्यात आली नाही. तरीही अशा रीतीने एखाद्या व्यक्तीला हेलिकॉप्टरला लटकावून त्याची धिंड काढणे हे चुकीचे आहे. अफगाणिस्तानातील तालिबान्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसेच विविध माध्यमांमध्येही यावर चर्चा सुरु झाली आहे.

तालिबान्यांकडे पायलट आहेत का? 

दरम्यान अमेरिका काबूल विमानतळावरच सोडून गेलेले हेलिकॉप्टर आणि छोटी विमाने उडवण्यासाठी तालिबान्यांकडे प्रशिक्षित वैमानिक आहेत का, असा प्रश्न पडला होता. परंतु तालिबान्यांनी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर उडवून याचे उत्तर जगाला दिले आहे. अमेरिकेने दावा केला होता कि, काबूल विमानतळ सोडताना मागे सोडून दिलेली  हेलिकॉप्टर  आणि छोटी विमाने ही नादुरुस्त करून ठेवली आहेत. ज्यामुळे तालिबान्यांना त्यांचा वापर करता येणार नाही. मात्र अमेरिकेचा हा दावाही तालिबान्यांनी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर उडवून फोल ठरवला आहे. यावरून तालिबानी अमेरिकेची जी काही आधुनिक तंत्रज्ञानांनी युक्त शस्त्रास्त्रे आहेत, ती देखील कुशलतेने हाताळतील, अशी भीती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here