विधान परिषदेत मतदानाचा कोटा वाढवण्यावर अंतिम क्षणी मुख्यमंत्री निर्णय घेणार – अजित पवार

98

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी शेवटच्या क्षणी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी मतांचा कोटा वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केली होती. आता विधान परिषद निवडणुकीत मतांच्या कोट्यावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदानाच्या दिवशी सुरुवातीच्या १ आणि २ आकड्यावर महाआघाडीतील तीन पक्ष त्यांच्या त्यांच्या उमेदवाराला मतदान करतील, त्यांनतर ३ आणि ४ थ्या जागेसाठी कसे प्राधान्य द्यायचे आणि मतांचा कोटा वाढवायचा का, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगितले.

मतसंख्या काटावरची, धोका पत्करू नये म्हणून कोटा वाढवणार 

आम्ही सर्व उमेदवार निवडून आणू यासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्ष प्रयत्न करणार आहेत. राष्ट्रवादीची ५१ मतसंख्या आहे, कोटा २६चा आहे, त्यामुळे काटावरची मतसंख्या आहे. राज्यसभा निवडणुकीत मते बाद ठरवली होती, यावेळी मलिक आणि देशमुख यांना मतदानासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे तसे विधानपरिषदेतही मते रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोका पत्करू नये याकरता अधिकची मते द्यावी लागणार आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणेवरून आमदारांवर दबाव नाही 

छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मतदान कसे करायचे याविषयी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भाजप आमदारांना केंद्रीय तपासाच्या नावाने दबाव टाकत आहेत, असे कोणत्याही आमदाराने सांगितले नाही, तरीही संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत आमदारांची बैठक होणार आहे, तेव्हा आमदार यासंबंधी माहिती देतील, राज्यसभेत आघाडीच्या पक्षांना आपापला कोटा होता, अतिरिक्त मते शिल्लक होती, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतला, आता काटावरची मतसंख्या आहे, आमच्याकडे दोन मते कमी झाली आहेत, ती अपक्षांना मदतीला घेऊन ती संख्या पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ती आम्हाला मिळतील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

(हेही वाचा shivsena anniversary 2022 : शिवसैनिक प्रवाहातील आणि प्रवाहाबाहेरील!)

क्षितिज ठाकूर मतदानाला येण्याची शक्यता कमी 

मुख्यमंत्री भेटत नाही, अशी तक्रार अपक्ष आमदारांची होती, आता अपक्षांची सगळ्यांनाच गरज आहे, त्यांचा मानसन्मान करावा लागेल, शेवटी आरोप प्रत्यारोप करणे चुकीचे आहे. बविआला सगळे जाऊन भेटले आहेत, जे स्वतंत्र विचारांचे आहेत त्यांना भेटून मते मिळवणे हे प्रत्येक पक्षाचे काम आहे. हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे परदेशात आहेत, ते मतदानाला येऊ शकतील का, ही शंका आहे. सध्या शिवसेनेचा एक आमदार मयत आहे, राष्ट्रवादीचे मलिक, देशमुख यांची मते कमी झाली आहेत. त्यामुळे मतांचा कोटा २६ होईल. मतदार जसे त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतात, तसे अपक्ष आमदार आम्हाला मतदान करतील, अशी अपेक्षा आहे. चमत्कार होईल कि नाही हे सोमवारी दिसणारच आहे. आता हा चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतो हे उभा महाराष्ट्र पाहिल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील, त्यांची विकेट पडेल, असेही पवार म्हणाले.

अपक्षांना सगळेच फोन करत आहेत 

शिवसेनेची मतसंख्या ५५ आणि छोटे पक्ष मिळून ६० होईल, त्यामुळे ६० सोडून इतर अपक्ष आहेत जे आघाडीला पाठिंबा देत आहेत, त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही फोन गेले आहेत, विरोधकही करत आहेत. सगळे जण फोन करत आहेत. अपक्ष आमदार भोयर यांनी संजय राऊत यांनी आक्षेप घेतल्याने दुखावले त्यांनी राऊत यांनी मतदान करताना आपल्यासोबत यावे असे म्हटले आहे, प्रत्यक्षात तसे होत नसते, अशा वक्तव्यावरून जास्त चर्चा करू नये, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे असते, असेही अजित पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.