विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल महत्त्वाचा असल्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीने या चार जागांसाठी जोर लावला आहे. बुधवारी, सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत चार जागांसाठी मतदान होईल. तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील. (Vidhan Parishad Election)
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंती क्रमाने मतदान होते. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी महायुतीने मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला आहे. (Vidhan Parishad Election)
मुंबईत भाजपाचे आव्हान
गेली ३० वर्ष मुंबई पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व ठेवून असलेल्या शिवसेना उबाठाला भाजपाने यावेळी आव्हान दिले आहे. मुंबई पदवीधरमध्ये एकूण आठ उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत उबाठाचे अनिल परब आणि भाजपाचे किरण शेलार यांच्यात होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात १२ हजार पदवीधर उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली नाहीत, या अनिल परब यांच्या आरोपामुळे ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबईतील १ लाख २० हजार ६७३ मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांचे भवितव्य आज निश्चित करतील. (Vidhan Parishad Election)
मुंबई शिक्षकमध्ये चौरंगी लढत
मुंबई विभागीय शिक्षक मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यापैकी उबाठाचे ज. मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, भाजपाचे शिवनाथ दराडे आणि शिवसेनेचे शिवाजी शेंडगे आणि समाजवादी गणराज्य पक्षाचे सुभाष मोरे हे पाच प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ८३९ मतदार आहेत. (Vidhan Parishad Election)
(हेही वाचा – Shaurya 2.0 : परमवीर चक्र, अशोक चक्र विजेत्यांविषयी माहिती आहे का?; असीम फाऊंडेशनने आणला अभिनव खेळ)
कोकण पदवीधरमध्ये सरळ लढत
कोकण विभागीय पदवीधर मतदारसंघात भाजपाचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात सरळ लढत होत आहे. निरंजन डावखरे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील भाजपाची यंत्रणा लक्षात घेता काँग्रेससाठी ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदारांची नोंद झाली आहे. नाशिक शिक्षकमध्ये २१ उमेदवार. (Vidhan Parishad Election)
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात शिंदे-पवार आमने सामने
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून एकूण २१ उमेदवार विधान परिषद निवडणुकीसाठी आपले नशीब अजमावत आहेत. तथापि, मुख्य लढत ही शिवसेनेचे किशोर दराडे, उबाठाचे संदीप गोपाळराव गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेंद्र भावसार यांच्यात आहे. विशेष म्हणजे येथे सत्ताधारी महायुतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे उमेदवार आमने-सामने उभे आहेत. विशेष म्हणजे येथे भाजपाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात ६९ हजाराहून अधिक मतदार आहेत. (Vidhan Parishad Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community