Vidhan Parishad Election : वरुण सरदेसाई का पडले बॅकफुटवर?

286
Vidhan Parishad Election : वरुण सरदेसाई का पडले बॅकफुटवर?

पदवीधर व शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेवर पाठवण्यात येणाऱ्या सदस्यांच्या निवडणुकीकरता उबाठा शिवसेनेकडून अनुक्रमे अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, अनिल परब यांना पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर पाठवले जात असले तरी प्रत्यक्षात या जागेवर खरा दावा हा उबाठा शिवसेनेच्या युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांचा होता. मागील अनेक महिन्यांपासून त्यांचेच नाव चर्चेत असून पाच ते सहा महिन्यांपूर्वी या निवडणुकीची घोषणा झाली होती, तेव्हा वरुण सरदेसाई यांच्याच नावाची चर्चा होती. त्यामुळे आयत्या वेळी सरदेसाई हे बॅकफुटवर जावून त्यांच्याऐवजी अनिल परब यांचे नाव जाहीर झाल्याने या मागील नक्की कारण काय असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. (Vidhan Parishad Election)

विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे उबाठा शिवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदार संघातील भाजपाचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांच्या सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. या चार जागांसाठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी उबाठा शिवसेनेकडून पदवीधर मतदार संघासाठी अनिल परब आणि शिक्षक मतदार संघातून ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Vidhan Parishad Election)

या पदवीधर मतदार संघातून आजवर डॉ. दीपक सावंत हे निवडून जात असत. परंतु सावंत यांचा पत्ता कापून उबाठा शिवसेनेने दहिसरमधील तत्कालिन विभागप्रमुख विलास पोतनीस यांची वर्णी लावली होती. आता पोतनीस यांचा पत्ता कापून अनिल परब यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दहिसरमधील उबाठा शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे वर्चस्व कमी होत असल्याने त्यांना बाजुला करून त्यांच्याऐवजी पोतनीस यांचे वर्चस्व वाढवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना उमेदवारी देत निवडून आणले होते. परंतु आता पुन्हा एकदा विनोद घोसाळकर पक्षात सक्रीय होत, त्यांचे वर्चस्व निर्माण होताच पक्षाने पोतनीस यांना डावलून अनिल परब यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – AAP च्या नेत्या आतिशी यांच्या अडचणी वाढल्या; न्यायालयाचा समन्स)

ठाकरेंना वाटते ही भीती

विशेष म्हणजे या पदवीधर मतदार संघातून युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी विधान परिषदेत जाण्याची स्वप्ने पाहिली होती. त्यामुळे पदवीधर मतदार संघातील पोतनीस यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या जागी वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती. तसेच वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु प्रत्यक्षात सरदेसाई यांच्याऐवजी अनिल परब यांच्या नावाची घोषणा झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. (Vidhan Parishad Election)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरुण सरदेसाई यांच्या नावाची चर्चा होती, ही बाब जरी खरी असली तरी सध्याच्या वातावरणात सरदेसाई यांना कुठल्याही बाबतीत पुढे न आणण्याचा निर्णय उबाठा शिवसेनेने घेतला आहे. सरदेसाई हे सध्या भाजपाच्या रडारवर असून जर त्यांना उमेदवारी दिली तर त्यांचे नाव पुन्हा चर्चेत येईल आणि सरदेसाई यांच्या पाठीमागे शुक्लकाष्ठ लागेल याची भीती ठाकरेंना वाटत आहे. त्यामुळे तुर्तास तरी विधान परिषदेवर न पाठवण्याचा निर्धार ठाकरेंनी केला असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आज विधान परिषदेत अनिल परब यांच्यासारख्या अनुभवी आणि आक्रमक व्यक्तीची गरज आहे. त्या तुलनेत सरदेसाई यांना पाठवल्यास त्यांना प्रथमपासून शिकावे लागणार आहे. ते ठाकरेंच्या शिवसेनेला परवडणारे नाही असेही बोलले जात आहे. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.