उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात उल्लेख केलेले ते निष्ठावान शिवसैनिक विजय सुर्वे नक्की कोणत्या गटाचे?

गोरेगाव येथील नेस्कोमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात निष्ठावान शिवसैनिक म्हणून कुलाब्यातील माजी शाखाप्रमुख विजय सुर्वे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी नरिमन हाऊसमध्ये दहशतवादी आणि केंद्रीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह एनएसजी कमांडोमध्ये धुमश्चक्री उडालेली असताना त्या जवानांना शिवसैनिकांनी चहा पाण्याची व्यवस्था केली होती, असे सांगत शिवसैनिक विजय सुर्वे यांना केंद्रीय सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेले पत्र दाखवले. परंतु ज्या विजय सुर्वे यांचा दाखला देत शिवसैनिकांच्या लढावय्या वृत्तीचे कौतुक केले जात असले तरी प्रत्यक्षात तिथे सुर्वे उपस्थितही नव्हतेच. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतल्याने सुर्वे हे शिवसेनेपासून लांब असून ते आता नक्की कुठल्या गटात आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : निसर्गरम्य कास पठार; पर्यावरणपूरक पर्यटनासाठी ई-बस सुविधा )

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत कोणताही दहशतवादी हल्ला होऊ द्या किंवा आपत्कालिन परिस्थिती निर्माण होऊ द्या, प्रत्येक घटनांमध्ये शिवसैनिकच पहिला धावून गेला असे सांगत नरिमन हाऊसमधील दहशतवादी आणि एनएसजी कमांडो यांच्यातील धुमश्चक्रीच्या वेळी शिवसेना शाखाप्रमुख विजय सुर्वे यांच्यासह गटप्रमुख व शिवसैनिकांनी एनएसजी कमांडोंना सर्व प्रकारची मदत केली होती, असे सांगितले. परंतु ज्या विजय सुर्वे यांच्या नावाचा उल्लेख केला आणि केंद्रीय सुरक्षा दलाने दिलेले प्रशस्ती पत्र दाखवले, ते विजय सुर्वे गटप्रमुखांच्या या मेळाव्यात गैरहजर असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती केल्यानंतर विजय सुर्वे  नाराज

शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती केल्याने विजय सुर्वे हे प्रचंड नाराज असून आजवर कोणत्याही पदांची आणि पैशांची लालसा न बाळगणाऱ्या ७१ वर्षीय विजय सुर्वे यांनी मागील अडीच वर्षांपासून पक्षापासून सुरक्षित अंतर ठेवण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. मागील अडीच वर्षांपासून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी फारकत घेतल्याने नाराज असलेल्या सुर्वे यांना एकनाथ शिंदे यांच्या रुपात बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा लुकलुकणारा तारा दिसून येवू लागला आहे. बेताल बोलणाऱ्या संजय राऊत यांना तेव्हाच रोखण्याची सूचना करूनही याकडे दुर्लक्ष केल्याने याचे परिणाम दिसून आल्याचे ते वारंवार आपल्या मित्रपरिवारांना सांगत असतात.

नरिमन हाऊस येथील एनएसजी कमांडोंना चहा पाण्याची व्यवस्था केल्याने शिवसैनिकांचा गौरव करणारे प्रमाणपत्र केंद्रीय सुरक्षा दलाकडून देण्यात आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून माध्यमांना माहिती दिली होती. त्यावेळी फोटो काढताना त्याकडे सुर्वे बघत नसल्याने खुद्द उध्दव ठाकरेंनी कॅमेऱ्यांकडे बघण्याची सूचना केली होती. पण त्यावेळी कॅमेऱ्याकडे न बघणाऱ्या सुर्वे यांना बाळासाहेबांनी मिश्किलपणे हा कधीही मंत्री होणार नाही,असे सांगितले. त्यावर सुर्वे यांनीही साहेब, मला मंत्री व्हायचे नाही, केवळ आपण हवे आहात, असे सांगत बाळासाहेबांचे मन जिंकले होते. कधीही पद, पैसा यांच्या मागे न धावणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या तुलनेत आताचा शिवसैनिक हा पद आणि पैशांचा मागे धावताना खुद्द सुर्वे यांच्यातील शिवसैनिक दु:खी होत आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, वेठबिगार नाहीत. निष्ठावंत आणि राष्ट्रभक्त आहोत, बाळासाहेब आणि स्वातंत्र्य विचारांशी प्रेरित झालेले आहोत,असे ते वारंवार सांगत असतात.

सुर्वे यांना कुठलेही पद नको किंवा काही पैसा नको, केवळ शाबासकीची थाप हवी आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून जेव्हा उध्दव ठाकरे हे २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यास आले, तेव्हा त्यांनी किमान आपल्यासारख्या शिवसैनिकांना बोलावून गौरव करायला पाहिजे होता, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर, ते आम्हा शिवसैनिकांना विसरले याची सल काहीशी सुर्वे यांच्या मनात असून अनेकदा त्यांनी मित्रांसमोर तशी भावनाही व्यक्त केली आहे.

गटप्रमुखांच्या मेळाव्यात विजय सुर्वे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले असले तरी त्यांना व्यासपीठावर बोलावून घेतले नाही, किंवा ते कुठे आहे याचीही विचारणा केली नाही. त्यामुळे सुर्वे यांच्या नावाचा उल्लेख करत एकप्रकारे शिवसैनिकांच्या ह्दयात स्थान मिळवण्याचा प्रयत्नात उध्दव ठाकरे यांना सुर्वे यांना बोलावून घेत त्यांचा सन्मान करण्याची गरज भासली नाही. त्यामुळे अनुपस्थित राहिलेले सुर्वे हे आता कुठल्या गटात जातात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here