देशाच्या हितासाठी हिंदू संघटित आणि बलसंपन्न होणे आवश्यक!

हिंदूंच्या मंदिरांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे आता हिंदू भक्तांनाच चालवण्यासाठी देण्याची आवश्यकता बनली आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

112

देशात सध्या अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही कट्टरपंथीय देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहेत. अशा वेळी देशहितासाठी हिंदूंनी संघटित आणि बलसंपन्न होणे गरजेचे आहे, तरच देशातील विविध समस्यांमधून कायमस्वरूपी तोडगा निघू शकेल, असे विचार सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्यानिमित्ताने नागपुरात आयोजित संघाच्या मेळाव्यात मांडले.

लोकसंख्या नीती बनवा!

देशात वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या बनली आहे. सीमावर्ती भागातील राज्यांमधून घुसखोरीच्या माध्यमातून लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार होणे गरजेचे आहे. १९५१ पासून २०११ पर्यंत लोकसंख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्क्यांवरून ८३.८ टक्के झाली तर मुस्लिमांची लोकसंख्या ९.८ टक्क्यावरून १४.२३ टक्के वाढली. म्हणून घुसखोरीवर तात्काळ नियंत्रण मिळवले पाहिजे. त्यासाठी सरकारला लोकसंख्या नीती बनवली पाहिजे, ती सर्व धर्मियांना लागू केली पाहिजे, असेही सरसंघचालक म्हणाले.

(हेही वाचा : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी वादाला सुरुवात! उद्धव ठाकरे करतील का खुलासा?)

काश्मिरात ९०च्या दशकाप्रमाणे ‘टार्गेट किलिंग’

काश्मिरात कलम ३७० हटवल्यानंतर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत आहे. दहशतवाद्यांचे भय देखील संपुष्टात आले. यामुळे नागरिकांचे मनोबल खच्ची करण्यासाठी आता तिथे ९०च्या दशकाप्रमाणे नागरिकांना ‘टार्गेट किलिंग’ सुरु केले आहे, परंतु आता तेथील जनता घाबरणार नाही, प्रशासनाला याचा चांगला बंदोबस्त करावा लागणार आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.

दोन राज्यांतील पोलिस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात!

आसाम आणि मिझोराम हे दोन्ही भारताचेच राज्ये असूनही त्या दोन राज्यांचे पोलिस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत? आपल्या राजकीय स्पर्धेतून आता सरकारांमध्येच विरोध होतोय. पक्षांचा विरोध असेल तर चालेल, पण सरकारी व्यवस्था तर एक आहे, संविधानानुसार ही व्यवस्था निर्माण झाली. संविधानानुसार आपण संघराज्य आहोत. सत्तेत बसलेल्या लोकांचेही वर्तन पोषक नसेल, तर मग समाजाला कोठून दिशा मिळेल?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या ताब्यात असावीत!

आज हिंदूंच्या मंदिरांच्या जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे आता हिंदू भक्तांनाच चालवण्यासाठी देण्याची आवश्यकता बनली आहे. त्यामुळे मंदिरांच्या संपत्तीचा उपयोग हिंदू धर्मियांच्या सेवेसाठी होईल, असेही सरसंघचालक म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.