महाराष्ट्राला रेमडेसिवीर देणा-या कंपनीच्या संचालकांची पोलिसांकडून चौकशी! फडणवीस आणि दरेकरांची पोलिस ठाण्यात धाव

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणा-या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांना विलेपार्ले पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. राजेश डोकानिया असे या संचालकांचे नाव आहे. हे कळताच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान चौकशीनंतर डोकानिया यांना सोडण्यात आले असल्याचे समजते.

काय आहे नेमके प्रकरण?

राज्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर फार मोठा ताण पडत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनावर उपचार म्हणून महत्त्वाचे असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटनाही समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात होणारा रेमडेसिवीरचा तुटवडा भरून काढण्यासाठी भाजपचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काही दिवसांपूर्वी दमण येथे भेट दिली होती. तेथील ब्रुक फार्मा या कंपनीकडून महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन त्यावेळी त्यांनी दिले होते. पण याच ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांना रेमडेसिवीरच्या साठ्यावरुन पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पण चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.

काय म्हणाले फडणवीस?

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दमण येथे जाऊन ब्रुक फार्मा या कंपनीला महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत विनंती केली होती. आपल्याला परवानगी मिळाली तर आपण रेमडेसिवीरचा पुरवठा महाराष्ट्राला करायला तयार असल्याचे ब्रुक फार्माकडून सांगण्यात आले. त्यानुसार आपण केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांना परवानगी देण्याची विनंती केली. त्यानुसार परवानगी प्राप्त झाली. शनिवारी ब्रुक फार्माकडून तयार करण्यात आलेल्या रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी कंपनीला महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी आपण मिळवून दिली. पण शनिवारी दुपारी मंत्र्यांच्या ओएसडी कडून डोकानिया यांना धमकी देण्यात आली. रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या परवानगीचे पत्रक दाखवल्यानंतर आता डोकानिया यांना सोडण्यात आले आहे. असे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र सरकारमधील काही मंत्री खूप चुकीचे राजकारण करत आहेत. त्यांना लोकांच्या आरोग्याची आणि जिवाची अजिबात काळजी नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

(हेही वाचाः गुजरातमधून महाराष्ट्राला ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शन!)

याआधीही झाले राजकारण

गुजरातमध्ये या इंजेक्शनचे मोफत वाटप भाजप कार्यालयातून होत आहे. त्यामुळे भाजप कार्यालयात रेमडेसिवीरचा साठा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे राजकारण पेटले होते. त्यानंतर प्रविण दरेकर यांनी दमण येथे जाऊन ब्रुक फार्मा कंपनीला भेट देऊन रेमडेसिवीर पुरवठ्याबाबत मागणी केली होती. त्यावेळी कंपनीचे संचालक राजेश डोकानिया तेथे उपस्थित होते.

काय आहेत रेमडेसिवीरच्या नवीन किंमती?

दरम्यान रेमडेसिवीरच्या काळ्या बाजारामुळे या इंजेक्शनच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. केंद्र सरकारने याकडे लक्ष देत सर्वसामांन्यांना परवडतील असे रेमडेसिवीरचे नवे दर जाहीर केले आहेत. महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर वरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोनामुळे असंख्य लोक रोज प्राण गमावत आहेत. राज्य सरकारच्या कोरोना सामग्री, सुविधांच्या नावाने असलेल्या बोंबेमुळे किती तरी निष्पाप बळी जात आहेत. अशा वेळी केंद्र सरकारकडून रेमडेसिवीरच्या  किंमतीत केलेले बदल सामान्य जनतेसाठी दिलासादायक ठरणार आहेत, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here