शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं रविवारी सकाळी अपघाती निधन झालं. यानंतर राजकारणासह सर्वच स्तरातून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात दाखल झालेत.
ही घटना दुर्दैवी, माझा विश्वासच बसत नाही
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनायक मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. माझा विश्वासच बसत नाही. त्यांच दुःखद निधन झालं आहे. त्यांनी मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली आहे. शिवरायांच्या स्मारकाबद्दलचीही त्यांची तळमळ मला जाणवली.
(हेही वाचा – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला)
ते पुढे असेही म्हणाले की, देवेंद्रजी आणि तुम्ही आता सत्तेत आलाय तर समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांना होता, ते भेटल्यावर बोलून दाखवत होते. आज मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठकही आम्ही बोलावली होती. पण त्या आधीच त्यांचं निधन झालं. वहिनींनाही आम्ही भेटलो, त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. मराठा समाजाच्या बैठकीला येताना त्यांचं निधन झालंय. मराठा समाजासाठीची त्यांची तळमळ याची दखल शासन घेईल. ही घटना महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी दुःखद आहे. मराठा समाजासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाठपुरावा केलाय, असा नेता आपल्यात नाही. त्यांचं दुःखद निधन झालंय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सामान्यांसाठी लढणार नेता हरपला – उपमुख्यमंत्री
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना भरून आल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, रविवारी सकाळी मला मॅसेज आला की हा अपघात झाला. यासंदर्भात मी माहिती घेत होतो. मेटे हे एक अतिशय संघर्षशील, गरिबीतून वर आलेलं नेतृत्व आहे. सुरूवातीपासून मराठा आरक्षणाचा लढा त्यांनी दिला आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील केला. कोर्टात केस लढण्यापासून ते आंदोलनापर्यंत त्यांनी मराठा समाजासाठी लढा दिला. गेले ८ ते १० वर्ष आम्ही सोबत काम केलं असून ते माझ्या जवळचे सहकारी होते. हे त्यांचं निधन राजकारणाची कधी न भरून निघणारी हानी आहे. त्यामुळे सामान्यांसाठी लढणार नेता आज गेल्याची भावना व्यक्त करत त्यांच्या कुटुंबाच्या पाठिशी शासन असल्याने फडणवीस म्हणाले.
मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्व गमावले – अजित पवार
शिवसंग्राम पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. त्यांच्या निधनानं मराठवाड्याचा कर्तृत्ववान सुपुत्र, मराठा चळवळीचं खंबीर नेतृत्वं हरपलं आहे. मी माझा निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायकराव मेटे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांची जाण असलेलं, मराठा समाज आणि मराठवाड्याच्या विकासासाठी कार्यशील असलेलं त्यांचं नेतृत्वं होत. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळ सोबत असलेले ते माझे सहकारी होते. त्यांचं अकाली निधन हा महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे, अशा शोकभावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
Join Our WhatsApp Community