विनायक मेटेंच्या अपघाताची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश

85

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा हा अपघात झाला. मेटे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या परिवाराची भेट घेतली आणि सांत्वन केले. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

(हेही वाचा – ‘हर घर तिरंगा’ अभियानावरून Twitter वॉर! उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला भाजपाकडून चोख प्रत्युत्तर)

अपघातानंतर तासभर कोणाचीही मदत नाही

दरम्यान, बीडकडून आम्ही मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला असल्याचे मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी सांगितले तर हा प्रकार घडल्यानंतर बराच वेळ मदत मागण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथे अॅम्ब्युलन्स पोहोचली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते माझ्याशी संवाद साधत होते, असेही एकनाथ कदम यांनी सांगितले आहे.

मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भावूक

या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात दाखल झालेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनायक मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. माझा विश्वासच बसत नाही. त्यांच दुःखद निधन झालं आहे. त्यांनी मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली आहे. शिवरायांच्या स्मारकाबद्दलचीही त्यांची तळमळ मला जाणवली. ही घटना महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी दुःखद आहे. मराठा समाजासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पाठपुरावा केलाय, असा नेता आपल्यात नाही. त्यांचं दुःखद निधन झालंय, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.