एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचे सरकार आले. मात्र यामुळे शिवसेनेची घसरण सुरु झाली, ही थांबवण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यभर निष्ठा यात्रा सुरु केली आहे. सोमवारी ही यात्रा कोकणात दीपक केसरकर यांचा मतदारसंघ सावंतवाडी येथे आली, तेव्हा खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर बोचरी टीका केली. याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी एका राऊत यांनी शिवसेना संपवली, आता दुसरे राऊत उरलेली शिवसेना संपवणार आहेत, असे म्हणाले.
काय म्हणाले विनायक राऊत?
उद्धव ठाकरेंची सभा मागच्या वेळी झाली नसती तर केसरकरांचे विसर्जन त्याचवेळी झाले असते. शिवसेनेत आल्यावर त्यांना आधार दिला. उद्धव ठाकरेंनी वैभव नाईक, राजन साळवींसारखा कार्यकर्ता असतानाही केसरकरांना मंत्रिपद दिले. लाड पुरवले. परंतु या पवित्र भूमीत असे गद्दार निर्माण झाले हे दुर्देव आहे, चार घरांची चव चाखून आलेले शिवसेनेला शहाणपणा शिकवायला निघालेत. हिंदुत्वावर आता हे पोपट बोलायला लागले. ज्या सावंतवाडीकरांनी बोट पकडून राजकारणात आणले. त्या दिलीप नार्वेकरांना फेकून दिले. शरद पवारांनी त्यांना आधार दिला त्यांच्या तोंडालाही केसरकरांनी पाने पुसली. ज्या शरद पवारांवर आरोप केले त्यांच्याबद्दल शब्द तोंडातून निघतात कसे? अशा शब्दांत विनायक राऊत यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली.
(हेही वाचा कोकण रेल्वेत नोकरीची संधी! परीक्षेविना होणार निवड; १ लाखापर्यंत मिळणार पगार)
काय म्हणाले केसरकर?
विनायक राऊतांचे नेमके शिक्षण मला माहिती नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण हे फारसे चांगले नाही. पण, ते जर असे बोलत असतील तर चुकीच्या माणसाला मी खासदार म्हणून निवडून आणले असे मी समजेल. कारण, मी जो लढा दिला, त्यामुळेच विनायक राऊत निवडून आले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. यांना कोकणात कसे ट्रीट केले जात, हे मला माहिती आहे. राजकारण हाच त्यांचा धंदा आहे. रेडी नावाचे एक पोर्ट आहे, ते त्यांचे भाच्चे चालवतात, त्यातून एकही रुपया खर्च न करता 300 कोटी रुपयांचा फायदा त्याला झाला. राजकारण हा यांचा धंदा बनला आहे. निष्ठा वगैरे यांना काही नाही. म्हणून एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली शिवसेना संपविण्यासाठी दुसरे राऊत पुरेसे आहेत, असे माझे मत आहे, असेही केसरकर यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community