विनायक शिंदे, नरेश गोरच्या एनआयए कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ!

एनआयएने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर गाडी ताब्यात घेतली आहे.

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेला विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांची एनआयए कोठडी मंगळवार, ३० मार्च रोजी संपली. त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले. त्या दोघांच्या एनआयएच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

वाझे, शिंदे आणि गोर यांचा एनआयएकडे ताबा!

मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे आधी एटीएस नंतर एनआयएने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. एटीएसने या प्रकरणी आधी सचिन वाझे याला अटक केली होती, त्यानंतर त्याचा ताबा एनआयएने घेतला, पुढे एटीएसने वाझेचा सहकारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना अटक केली. आता हिरेन यांचा मृत्यू आणि अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेले गाडी सापडल्याचे प्रकरण या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए करत आहे. त्यामुळे सचिन वाझे, शिंदे आणि गोर तिघांचा ताबा आता एनआयएकडे आहे.

शिंदे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता!

विनायक शिंदे हा बडतर्फ पोलीस शिपाई असून तो २००७मध्ये झालेल्या लखनभैय्या कथित चकमक प्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कोरोनाच्या काळात मे महिन्यात त्याला संचित रजा मिळाली होती. त्यानंतर विनायक शिंदे हा सचिन वाझे याच्या संपर्कात आला आणि वाझेच्या बेकायदेशीर कामात त्याला मदत करीत होता.

(हेही वाचा : नवीन पोलिस आयुक्तांकडून झाडाझडती सुरू!)

गोर हा बुकी आहे! 

नरेश गोर हा ठाण्यातील क्रिकेट बुकी आहे. त्याने गुजरात राज्यातून तेथील एका कंपनीच्या नावावर १४ मोबाईल सीम कार्ड मिळवले होते. त्यानंतर सचिन वाझे याच्या सांगण्यावरून गोर याने ती सर्व सीम कार्ड विनायक शिंदे याला दिली होती.

वाझेकडील आणखी एक गाडी जप्त!  

एनआयएने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतल्या वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर गाडी ताब्यात घेतली आहे. ही आऊटलँडर गाडी कामोठे परिसरातल्या एका सोसायटीत पार्क करण्यात आली होती. बरेच दिवस गाडी वापरात नसल्याने स्थानिकांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली, ज्यावरून या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाची व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएची एक टीम घटनास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे. आतापर्यंत एनआयएने वाझे याच्याशी संबंधित दोन मर्सिडीज, 1 ऑडी, इनोव्हा, स्फोटक सापडलेली स्कॉर्पिओ आणि नुकतीच ताब्यात घेतलेली आऊटलँडर अशा 6 गाड्या मिळालेल्या आहेत.

क्राईम ब्रांचमधील एका अधिकाऱ्याला पाठवले समन्स! 

एनआयए या 6 गाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात आहे. एनआयएने क्राईम ब्रांचमध्ये काम केलेल्या एका अधिकाऱ्याला समन्स पाठवले आहे, अशी विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या अधिकाऱ्याची नुकतीच क्राईम ब्रांचमधून बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात या अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आहे. 4 मार्च रोजी मनसुख याची हत्या करण्यात आली, तेव्हा तो अधिकारी पोलीस आयुक्तालयातील सीआययुच्या कार्यालयात होता. सचिन वाझेने त्याचा फोन त्या अधिकाऱ्याकडे दिला होता आणि कोणाचा फोन आलाच तर तो रिसिव्ह करून वाझे ऑफिसमध्ये असून बिजी असल्याचे सांगायला सांगितले होते. याआधीही या अधिकाऱ्याची एटीएसकडून चौकशी झाल्याची सूत्रांनि सांगितले आहे. एनआयएला संशय आहे की, वाझे ठाण्याला गेला तेव्हा हा फोन याच अधिकाऱ्याकडे मुद्दाम देण्यात आला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here