अखेर स्थायी समितीचे दरवाजे विनोद मिश्रा यांच्यासाठी खुले!

विनोद मिश्रा स्थायी समितीत पाठवून भाजपला ताकद अधिक वाढवायची आहे.

मुंबई महापालिकेतील भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांचे अखेर स्थायी समितीवर जाण्याचे स्वप्न साकार होत आहे. विनोद मिश्रा यांची स्थायी समितीवर वर्णी लावण्यासाठी चेंबूरमधील नगरसेविका आशा मराठे यांचा समिती सदस्यत्वाचा राजीनामा मागून घेण्यात आला आहे. त्यामुळे आशा मराठेंच्या जागी मिश्रा यांची वर्णी लावण्यात  येणार आहे, तर आशा मराठे यांना मिश्रा यांच्या जागी सुधार समितीत पाठवण्यात येणार असल्याचे समजते. यापूर्वी अशाच प्रकारे स्थायी समितीतून अभ्यासू नगरसेवक अभिजित सामंत यांचा राजीनामा मागू घेण्यात आला होता.

आशा मराठेंनी दिला समिती सदस्यत्वाचा राजीनामा!

मिश्रा यांची निवड स्थायी समितीवर झाल्यास शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरु शकेल आणि विद्यमान गटनेते प्रभाकर शिंदे आणि भालचंद्र शिरसाट यांच्यासह भाजपची तोफ अधिक धडाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी निवड झालेल्या चेंबूरमधील नगरसेविका आशा मराठे यांना पक्षाने समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. मात्र, एकाबाजुला मराठे यांना स्थायी समितीतून तर भाजपचे महापालिका पक्षेनेते विनोद मिश्रा यांना सुधार समिती सदस्यपदाचा राजीनामा देण्यास लावला आहे. त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी आपापल्या समिती सदस्यत्वाचा राजीनामा महापौरांकडे सादर केला असून येत्या महापालिका सभागृहात हे राजीनामे मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यानंतरच्या महापालिका सभेत या रिक्त जागांवर नवीन सद्स्यांची नावे महापौरांना सादर केली जाणार आहे.

(हेही वाचा : राज ठाकरेंवर सेनेची कुरघोडी! पार्काच्या नूतनीकरणासाठी कंत्राटदारही नेमला! )

स्थायीतील ताकद वाढवण्याचा भाजपचा निर्णय!  

विनोद मिश्रा यांना यापूर्वीच स्थायी समितीवर यायचे होते. परंतु त्यांच्या नावाचा विचार न करता नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट, नगरसेवक हरिष भांदीर्गे, नगरसेविका आशा मराठे यांची वर्णी लावण्यात आली होती. तेव्हापासून विनोद मिश्रा नाराज होते आणि त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत जावून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र, स्थायी समितीत आपल्याला डावलले गेल्याने मिश्रा यांनी समिती अध्यक्षांच्या विभागामध्ये स्थानिक विकासकामांसाठी अधिक मिळवलेला निधी आणि समितीतील असमान निधीवाटप याविरोधात सर्व स्तरावर तक्रारी केल्या करत अध्यक्षांना जेरीस आणले होते. त्यामुळे भाजपचा अजेंडा राबवताना मिश्रा यांनी उचलेल्या या पावलामुळे तसेच शिंदे व शिरसाट यांच्याबरोबर मिश्रा  यांना पाठवून समितीतील ताकद अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या नेत्यांमध्ये कुरघोड्या!

शिंदे आणि शिरसाट यांचे मिश्रा यांच्याशी पटत नसले तरी समितीत मकरंद नार्वेकर आणि मिश्रा ही जोडगोळी आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे आणि शिरसाट हे काही मोजक्याच प्रस्तावावर बोलतांना सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणत नाही. त्यामुळे मिश्रा यांची वर्णी मुंबई अध्यक्षांनी लावण्याचा निर्णय घेतल्याचेही बोलले जात आहे. स्थायी समितीत यापूर्वी अभिजित सामंत हे अभ्यासू नगरसेवक असताना पक्षाने त्यांचा राजीनामा मागून घेत त्यांना सुधार समितीत बसवले. तसेच अभ्यासू नामनिर्देशित नगरसेवक गणेश खणकर यांचा राजीनामा मागून घेत पक्षाचे प्रवक्ते व माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांची वर्णी लावली गेली. मात्र, शिरसाट नामनिर्देशित नगरसेवक झाल्यापासून पक्षाची सर्व सुत्रे आपल्याच हाती ठेवत असून अनंतकाळ सभागृहनेतेपद भूषवणाऱ्या अनुभवी व ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे हे केवळ नामधारी गटनेते ठरताना दिसत आहे. शिंदे हे पदाने गटनेते असले तरी अप्रत्यक्षपणे शिरसाट हेच गटनेते असल्यासारखे वावरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे की शिरसाट असा प्रश्न महापालिकेतील सर्वांनाच पडू लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here