काँग्रेसचे मोदींच्या विरोधात आंदोलन… पडला कोरोनाचा विसर

जनतेला सरकारने कोरोनाचे कारण देत घरी बसवले असताना, राजकीय पक्ष मात्र जणू काही कोरोना वैगरे काहीच नसल्यासारखे वागत आहेत.

केंद्रात मोदींचे सरकार येऊन 30 मे रोजी सात वर्ष पूर्ण झाली. याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने निषेध कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट असताना, काँग्रेसच्या या आंदोलनाने त्यांना कोरोनाचा विसर तर पडला नाही ना? असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. एकीकडे जनतेला सरकारने कोरोनाचे कारण देत घरी बसवले असताना, राजकीय पक्ष मात्र जणू काही कोरोना वैगरे काहीच नसल्यासारखे आंदोलन करताना पहायला मिळत आहेत.

कार्यक्रमातून पोलिसांना काढले बाहेर

मुंबईतही मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने कार्यक्रम घेतला. यावेळी कार्यक्रमाच्या जागी पोलिस आल्याने काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप पोलिसांवर भडकले. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करता? तुमचे काय काम? असा सवाल भाई जगताप यांनी पोलिसांना केला. त्यानंतर चक्क या कार्यक्रमातून पोलिसांना बाहेर काढण्यात आले.

(हेही वाचाः पंतप्रधान मोदींची दुसरी टर्म : लोकप्रियतेला लागली घसरण! )

तर मला अटक करा

गेल्या सात वर्षांत भाजपने देशात काहीच विकास केला नाही, उलट देश भकास केला. गेल्या सात वर्षांत काय केले? काय प्रगती केली?, असा सवाल भाई जगताप यांनी केला. आम्ही कायदा पाळून आंदोलन करत आहोत. जर आम्ही कायदा मोडून आंदोलन करत आहोत असे वाटत असेल, तर पहिली मला अटक करा, असे भाई यावेळी म्हणाले.

70 वर्षांत कमावलं, ते 7 वर्षांत गमावलं

लसीकरण केंद्र आहेत, मात्र लसीकरण केंद्रात अवघ्या 100 लस आहेत. लसींचा पुरवठा होत नाही, देशाला लस मिळत नाही. काँग्रेसने 70 वर्षात काय केलं हे कोणत्या तोंडाने विचारता? असा सवालही त्यांनी केला. आम्ही 70 वर्षांत 13 लसींची निर्मिती केली. पण लोकांना रस्त्यावर येऊ दिले नाही असे भाई म्हणाले. गेल्या 70 वर्षांत देशानं जे कमावलं ते अवघ्या सात वर्षांत गमावलं आहे. मोदी हे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. केनिया सारखा देश आपल्याला मदतीसाठी विचारतो आणि केंद्र सरकार त्यांच्यापुढे कटोरा घेऊन उभे राहते ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका जगताप यांनी केली.

(हेही वाचाः सभागृह नेते कमजोर, भाजपचे नगरसेवक ठरतात वरचढ!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here