राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी १६ ऑक्टोबरला मतदान

110

राज्यातील १ हजार १६५ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १३ ऑक्टोबरला होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली असून, १६ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

( हेही वाचा : राज्यातील पोलीस दलाचे आधुनिकीकरण होणार, केंद्राला फेरप्रस्ताव पाठविण्याची फडणवीसांची सूचना)

राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंबर २०२२ रोजी १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा (१८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १७ ऑक्टोबर रोजी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ संबंधित तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने निश्चित करतील, अशी माहिती देण्यात आली.

भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष

मागच्या आठवड्यात १९ सप्टेंबरला राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. त्यात भाजपने बाजी मारीत पहिला क्रमांक पटकावला. राष्ट्रवादीनेही भाजपच्या खालोखाल ग्रामपंचायती मिळवल्या. पहिल्यांदाच निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या एकनाथ शिंदे गटानेही काही ठिकाणी अनपेक्षित विजय मिळवला. शिवसेना आणि काँग्रेसला मात्र मोठा फटका बसल्याचे दिसून आले. त्यावेळच्या बलाबलानुसार भाजप १४४, राष्ट्रवादी १२६, शिंदे गट ४१, शिवसेना ३७, तर काँग्रेसला ६२ जागांवर विजय मिळाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.