-
प्रतिनिधी
बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी संसदेत सादर होणार असून, यावरून भाजपा आणि महायुतीने शिवसेना उबाठा पक्षाची कोंडी करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना थेट सवाल करताना म्हटले आहे की, “उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत तुष्टीकरण करणार?”
विधेयकावरून देशभर गदारोळ
वक्फ सुधारणा विधेयकावरून मागील काही महिन्यांपासून देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि गदारोळ सुरू आहे. गेल्या वर्षी हे विधेयक प्रथमच संसदेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीकडे ते पाठविण्यात आले. समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाने मूळ विधेयकात काही सुधारणा सुचवून त्यास मंजुरी दिली.
मात्र, संसदेत हे विधेयक मांडले गेले, तेव्हा शिवसेना उबाठा खासदार अनुपस्थित होते. यामुळे शिवसेना उबाठाला जोरदार टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी मातोश्रीबाहेर काही लोकांनी निदर्शने करत या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
(हेही वाचा – Gujarat मध्ये अग्नितांडव! फटाक्याच्या कारखान्याला आग; १७ लोकांचा मृत्यू)
आज लोकसभेत मांडले जाणार विधेयक
वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी दुपारी १२ वाजता लोकसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावर आठ तास चर्चा अपेक्षित आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) लोकसभेत संख्याबळाच्या जोरावर हे विधेयक सहज मंजूर करू शकते. त्यामुळे भाजपाने आपल्या सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे.
फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स (माजी ट्विटर) वरून उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सवाल केला आहे. त्यांनी म्हटले की, “उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आता हिंदुत्ववादी भूमिका कायम ठेवणार की काँग्रेसच्या भूमिकेचे अनुसरण करून तुष्टीकरणाचा मार्ग स्वीकारणार?”
शिवसेना उबाठा नेमकी काय भूमिका घेतो, हे पाहणे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणार आहे. कारण लोकसभा तसेच महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना उबाठाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाच्या मतांचा पाठिंबा मिळाला होता. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे एकीकडे हिंदुत्ववादी भूमिका आणि दुसरीकडे वक्फ सुधारणा विधेयक या कोंडीत शिवसेना उबाठा सापडला आहे.
(हेही वाचा – युट्यूबर Ranveer Allahabadia याला पासपोर्ट देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार)
राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता
भाजपाने या मुद्द्यावरून शिवसेना उबाठावर राजकीय दबाव वाढवण्याची तयारी केली आहे. शिवसेना उबाठा विधेयकाला समर्थन देते की विरोध करतो, यावरून त्यांची भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट होईल. यामुळे या विधेयकाच्या चर्चेवर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community