प्रभागसंख्या वाढवण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय चुकीचा होता! उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले कारण

148

ठाकरे सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभागसंख्या २२७ वरून २३६ वाढवण्याचा निर्णय घेतला, तो चुकीचा होता, कारण प्रभाग पुनर्रचना करताना ती २०११ च्या जनगणनेवर करण्यात आली होती, त्यामुळे वाढविलेल्या प्रभागांमध्ये नेमकी किती लोकसंख्या आहे हे निश्चित माहिती नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय बदलून मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या पुन्हा २२७ करत आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

( हेही वाचा : सोलापूरात शासकीय परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयात सुरू असलेल्या बेकायदेशीर आंदोलनाचा निषेध )

मुंबई महापालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यांत आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक क्रमांक १९ विधान परिषदेत मांडण्यात आले, त्यावेळी आमदार भाई जगताप यांनी या विधेयकाला विरोध करत आम्ही ठाकरे सरकारचा भाग होतो तरीही आम्ही या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमचा आक्षेप प्रभाग २३६ करण्याला नाही तर प्रभाग पुनर्रचना ज्या प्रकारे केली आहे, त्याला आहे, असे म्हटले.

प्रभाग पुनर्रचना अशास्त्रीय

त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील सरकारने प्रभाग पुनर्रचना अशास्त्रीय पद्धतीने केली होती. कारण २०२१ मध्ये जनगणना झाली नाही, २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारे अंदाजे प्रभाग वाढवण्यात आले होते. कोणत्या गटात, वॉर्डात किती लोकसंख्या वाढली याची निश्चित माहिती नाही. मतदार यादीचा आधारे हे करता येत नाही, त्यासाठी जनगणना होणेच अनिवार्य आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुढच्या वर्षी जनगणना होईल, त्यानंतर सरकार स्वतः निवडणूक आयोगाला प्रभाग पुनर्रचना करण्यात यावी यासाठी पत्र देईल, त्यावेळी सरकार हस्तक्षेप करणार नाही, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. यानंतर हे विधेयक विधान परिषदेत एकमताने मंजूर झाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.