खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगला रविवार २३ एप्रिल रोजी पंजाब पोलिसांना ताब्यात घेतले. तो गेल्या १८ मार्चपासून फरार होता. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी किरणदीप कौर हिला ताब्यात घेतल्यामुळे लपून बसलेल्या अमृतपालला आत्मसमर्पण करावे लागले. त्याची रवानगी आसामला केली जाणार आहे.
पोलिसांनी अमृतपाल याला रविवारी सकाळी ७ वाजता रोडे गावातील गुरुद्वाराजवळून ताब्यात घेतले आहे. अटकेपूर्वी अमृतपालने गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना आणि उपस्थितांना संबोधित देखील केले. अमृतपाल सिंगची पत्नी किरणदीप कौरलाही दोन दिवसांपूर्वीच पंजाब पोलिसांनी अमृतसर विमानतळावरून ताब्यात घेतले होते. किरणदीप लंडनला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली होती. खलिस्तानी अमृतपाल सिंग ३६ दिवसांनंतर पंजाब पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
त्याच्यावर शांतता भंग करणे, हिंसाचार करणे असे अनेक आरोप आहेत. गेल्या १८ मार्च रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तो फरार होता. पत्नीला अटक झाल्यामुळे अमृतपालची पुढची योजना फसली. त्यामुळे त्याला नाक घासत आत्मसमर्पण करावे लागल्याची माहिती मिळाली आहे.
पंबाज पोलिसांनी अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांना अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून अमृतपालचे कुटुंबीय आणि नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, अमृतपाल सिंग याला आसामच्या डिब्रुगडमधील तरुंगात पाठवण्यात येणार आहे. या तरुंगात अमृतपाल सिंगच्या अनेक सहकाऱ्यांसह समर्थकांनाही ठेवण्यात आले आहे.