महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील! सामनातून थेट इशारा

राज्यांतील सरकारे त्यांना मानणा-या राजकीय पक्षाची नसली तर अशा राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे.

साकीनाका येथील बलात्कारानंतर राज्यातील महिला सुरक्षेवर तोडगा काढण्यासाठी राज्यपालांनी सरकारला लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील भाजपा नेते या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रातील भाजपा सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. केंद्रातील सरकारने त्यांचे सरकार नसलेल्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. पण महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील, असा थेट इशारा सामनातून देण्यात आला आहे.

(हेही वाचाः पत्र पाठवण्याआधी मुख्यमंत्र्यांनी प्रकरण समजून घ्यावे! फडणवीसांचा खोचक सल्ला)

राज्यपालांसारख्या संस्थांचे अवमूल्यन

घटनेने आखून दिलेल्या नियमांनुसार राज्यातील राज्यपालांनी काम करणे अपेक्षित असताना, राज्यपाल राजभवनात बसून त्यांनीच शपथ दिलेले सरकार अस्थिर करण्यासाठी बळ लावत असतील, तर ते किती योग्य आहे? राज्यांना धडपणे काम करू न देता राज्यातील आपल्या हस्तकांना हवा तसा गोंधळ घालू द्यायचा, त्यासाठी राज्यपालांसारख्या घटनात्मक संस्थांचे अवमूल्यन करायचे, लोकशाहीचे हेच चित्र सध्या आपल्या देशात पहायला मिळत आहे, असा आरोपही सामनातून केंद्रातील सरकारवर करण्यात आला आहे.

(हेही वाचाः राज्यपाल निभावतात मदमस्त हत्तींचा ‘रोल’! सामनातून घणाघात)

राष्ट्रीय एकतेस चूड लावण्याचा प्रयत्न

दिल्लीत नवे संसद भवन उभारल्याने लोकशाही टिकेल व वाढीस लागेल असे कुणाला वाटत असेल तर त्यांच्या पायाखाली चिरडलेल्या संघराज्य व्यवस्थेच्या किंकाळ्याही त्यांनी ऐकायला हव्यात. केंद्र सरकार, पंतप्रधान हे देशाचे नेते आहेत. मग राज्यांतील सरकारे त्यांना मानणा-या राजकीय पक्षाची नसली तर अशा राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातही तोच प्रकार सुरू आहे. पण महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका, असा धमकीवजा इशारा केंद्रातील भाजपा सरकारला सामनातून देण्यात आला आहे.

(हेही वाचाः राज्य सरकार अशी करत आहे ओबीसींची फसवणूक! फडणवीसांनी दिली माहिती)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here