मुंबईकरांवरील संभाव्य पाणीकपात टळली! धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा

१८ दिवसांमध्ये मुंबईकरांच्या एकूण पाणीसाठ्यात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची अर्धी तहान पावसाने भागवली आहे.

78

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि धरणांमधील पाणी साठ्यात दिवसेंदिवस वाढत होत दहा लाख दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा झाला. मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्यापैकी ७० टक्के पाण्याचा साठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील संभाव्य पाणी कपातीचे संकट आता दूर झाले असले, तरी जुलै महिन्याच्या शेवटालाच दहा लाख दशलक्ष लिटर पाण्याचा साठा जमा झाल्याने पुढील दोन महिन्यांमध्ये तलाव आणि धरणे भरुन पाणी समुद्रात वाहून जात वाया जाणार आहे.

१ लाख ०१ हजार ३८७ कोटी लिटर पाण्याचा साठा जमा झाला

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी आदी धरण तथा तलावांमधून दरवर्षी ३,८०० दशलक्ष लिटर अर्थात ३८० कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष अर्थात १ लाख ४४ हजार कोटी लिटर पाण्याचा साठा असणे आवश्यक असते. या एकूण पाणी साठ्याच्या तुलनेत सध्या १० लाख १३ हजार ८७० दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ०१ हजार ३८७ कोटी लिटर पाण्याचा साठा जमा झाला आहे.

(हेही वाचा : सायक्लॉन शेल्टर उभारणीत राज्य सरकारची हलगर्जी भोवली)

मुंबईकरांची वर्षभराची अर्धी तहान केवळ १८ दिवसांत भागली

मागील वर्षी याच कालवधीत ३२ टक्के एवढा पाणीसाठा होता, तर त्या आधीच्या म्हणजे २०१९मध्ये ७५.२५ टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत पाच टक्के पाणीसाठा कमी असला तरी ज्याप्रमाणे जुलै महिन्याच्या १० तारखेपर्यंत जिथे या सर्व धरण तसेच तलाव क्षेत्रांमध्ये केवळ १८ टक्के एवढाच पाणीसाठा होता. परंतु पुढील १८ दिवसांमध्ये तब्बल एकूण साठ्याच्या ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची अर्धी तहान केवळ १८ दिवसांमधील पावसाने भागवली आहे. सर्वसाधारणपणे ३० जुलैपर्यंत सर्व तलाव व धरणांमध्ये ३० ते ३५ टक्के एवढा पाणीसाठा असणे आवश्यक मानले जाते. कारण पुढील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या पावसात उर्वरीत ६० ते ७० टक्के पाण्याचा साठा वाढला जातो. ज्यामुळे मुंबईकरांना पूर्णपणे पाण्याचा वापर करता येतो. परंतु हे तलाव २८ जुलैपर्यंतच ७० टक्के भरल्याने पुढील काही दिवसांमध्ये ते पूर्णपणे भरले जातील आणि त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडे करावे लागतील. परिणामी यातील पाणी नदी,खाडी,समुद्रामध्ये वाहून जाईल.

२८ जुलैपर्यंतचा जमा झालेला पाणीसाठा

सन २०२१ : १० लाख १३ हजार ८७० दशलक्ष लिटर

सन २०२० : ४ लाख ७३ हजार ११३ दशलक्ष लिटर

सन २०१९ : १० लाख ८९ हजार १५४ दशलक्ष लिटर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.