…तर 7 जूनपासून रायगडावरुन आंदोलन करू! संभाजी राजे छत्रपतींची घोषणा 

राजकीय पक्षांच्या भांडणात आम्हाला रस नाही. आम्हाला जो न्याय शिवरायांनी दिला, शाहू महाराजांनी दिला तो आम्हाला द्या.

132

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज नाराज झाला आहे. या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले. त्यात मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली आहे. 7 जूनला शिवाजी महाराज छत्रपती झाले. आज मी घोषणा करतो, जर 7 जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर 7 जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करू, असा इशारा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी दिला आहे.

राजकारण नको, न्याय हवा

यावेळी आपली भूमिका मांडताना संभाजीराजे म्हणाले, मी सकल मराठा समाजाच्या वतीनं बोलतोय, कुठल्याही पक्षाच्या विरोधात, कुठला राजकीय अजेंडा घेऊन मी आलो नाही. आमचा सरळ आणि थेट विषय आहे, सकल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मी शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महारांजांचा वारस आहे. 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढतोय. शिवाजी महारांजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. राजर्षी शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण दिलं, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता. राजकीय पक्षांच्या भांडणात आम्हाला रस नाही. आम्हाला जो न्याय शिवरायांनी दिला, शाहू महाराजांनी दिला तो आम्हाला द्या, असे मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्या! संभाजी राजेंचे शरद पवारांना आवाहन )

सरळ आणि थेट एकच विषय

राजकीय पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत, पण तुमच्या भांडणात आम्हाला रस नाही.  समाजाने ५६ मोर्चांतून आपली ताकद दाखवली. आता खासदार, आमदारांची जबाबदारी आहे. सरकार आणि विरोधकांचे हे असे वागणे पाहून मी अस्वस्थ होतो. मी मराठा समाजाचा शिपाई म्हणून आलो आहे. मराठा आरक्षणासाठी आमची लढाई सुरू आहे. आपला कायदा रद्द झाला, म्हणून आपण SEBC मध्ये मोडत नाही. आपण सामाजिक मागास राहिलेलो नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मी सामंजस्याची भूमिका घेतली. कोरोना महामारी असल्याने जगलो तर लढू शकतो. पण सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप माझ्यावर झाला. सत्ताधारी-विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. पण मी शिव-शाहूंचा वंशज आहे. आमचा सरळ आणि थेट एकच विषय, सकल मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, अशी थेट आणि आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

मराठा समाजाचे हाल करू नका

9 ऑगस्ट 2017ला मुंबईत स्टेजवर गेलो आणि नम्रता दाखवली, तेव्हा सर्व मावळे माझे ऐकून परत गेले. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी जो न्याय मिळवून दिला, तो न्याय द्या. समाजाला वेठीस धरू नका, त्यांनी त्यांची ताकद दाखवली. आता त्यांना रस्त्यावर बोलवून त्यांचे हाल करू नका, असे आवाहनही संभाजी राजे छत्रपतींनी केले आहे.

(हेही वाचाः संभाजी राजेंच्या मनात चाललंय काय?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.