राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवार, 23 डिसेंबरला परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. तसेच परभणीत येताना राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. त्यांच्या टीकेला आता खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. कपड्याचा रंग निळा असला म्हणजे कुणी आंबेडकरवादी होत नाही, त्यासाठी आत काहीतरी असायला हवे, असा टोला राणे यांनी राहुल गांधींना लगावला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप केला. पीडितांना जबर मारहाण करण्यात आली आहे. हा 99 टक्के नव्हे तर 100 टक्के कोठडीत झालेला मृत्यू आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या आरोपांवर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले नारायण राणे?
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना महाराष्ट्र कळलेला नाही. राहुल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळलेत का? असा सवाल नारायण राणे यांनी केला. कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागते, असा जोरदार टोला नारायण राणे यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे.
राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले – मुख्यमंत्री फडणवीस
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिले. राहुल गांधी केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते. ही राजकीय भेट होती, असे ते म्हणाले. लोकांमध्ये जाती जातीत भेद निर्माण करण्याचे काम ते गेली अनेक वर्षे करत आहेत. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विद्वेषाचे काम केले आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला. तसेच आमचे सरकार संवेदनशील असल्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community