बंगालमध्ये ममता दिदी विरुद्ध सीबीआय वाद पेटला! दिदींचा सीबीआय कार्यालयात ठिय्या

यावेळी ममता बॅनर्जी यांनी मला सुद्धा अटक करा, असे सीबीआयला सांगितल्याचे सूत्रांकडून कळत आहे.

79

पश्चिम बंगाल मधील नारदा घोटाळ्याचा सीबीआयद्वारे तपास सुरू आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने धाड सत्र सुरू केले आहे. सोमवारी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री फिरहाद हाकीम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही माहिती मिळताच ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआय कार्यालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता सीबीआय विरुद्ध ममता सरकार हा वाद चांगलाच पेटणार आहे.

दिदी म्हणाल्या मलाही अटक करा

मंत्री आणि नेत्यांवर केलेल्या कारवाईमुळे आता बंगालमध्ये केंद्रीय यंत्रणा सीबीआय आणि ममता बॅनर्जी यांच्यातील तणाव वाढला आहे. आपल्या सरकारमधील नेत्यांच्या चौकशीदरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट सीबीआयच्या कार्यालयात धडक दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसल्या आहेत. तसेच त्यांच्या वकिलांनी मंत्री आणि आमदारांना कुठल्याही नोटिस शिवाय अटक करता येणार नाही, असे सांगितले. यावेळी ममता बॅनर्जी यांनी मला सुद्धा अटक करा, असे सीबीआयला सांगितल्याचे सूत्रांकडून कळत आहे. पण या चारही नेत्यांना सीबीआयतर्फे न्यायालयात हजर केले जाणार असून, सीबीआयकडून या चौघांच्या न्यायालयीन कोठडीसाठी मागणी करण्यात येणार असल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

राज्यपालांनी दिली होती चौकशीची परवानगी

या चारही नेत्यांच्या सीबीआय चौकशीसाठी काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी परवानगी दिली होती. नारदा घोटाळ्याच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान या चारही नेत्यांचा व्हिडिओ स्टिंग टेपमध्ये समोर आला होता.

काय आहे नारदा घोटाळा?

पश्चिम बंगालमधील 2016च्या विधानसभा निवडणुकांआधी नारदा घोटाळ्याच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ, समोर आला होता. तृणमूल काँग्रेसचे नेते एका काल्पनिक कंपनीकडून रोख रक्कम घेताना या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. या चौकशीत अनेक नेत्यांची नावे समोर आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.