पश्चिम बंगाल निवडणूक : ‘दीदी’, ‘मोदी’ नावाने बाजारात आली मिठाई! 

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्ष प्रचारासाठी विविध फंडे शोधत आहेत. त्यासाठी त्यांनी मिठाईलाही सोडले नाही. 

निवडणूक म्हटली कि आरोप-प्रत्यारोप, सभा-रॅली हे नित्याचेच असते. त्यात जर विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक असेल तर त्याला जरा जास्तच जोर येतो. जसजसा प्रचार रंगात येऊ लागतो, निवडणुकीची तारीखही घोषित होते, तसे अधिकाधिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जातात. मग त्यासाठी राजकीय पक्ष बॅनर, होर्डिंग, झेंडे, बिल्ले, हस्तपत्रक अशा प्रचार साहित्यांचा वारेमाप वापर करून अक्षरशः संपूर्ण राज्य दणाणून सोडतात. दिवस-रात्र सतत मतदारांना सर्वत्र आपल्याच पक्षाची निशाणी कशी दिसेल, यासाठी सर्वच पक्ष धडपडत असतात. अशीच धडपड सध्या पश्चिम बंगालमध्ये राजकीय पक्षांची सुरु आहे. इथे कालपर्यंत महिलांच्या साड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दिसत होते, आता मिठाईंवर मोदी दिसू लागले आहेत, तसेच ममता बॅनर्जी यांच्याही नावाने मिठाई बाजारात आली आहे.

मिठाईला आला राजकीय रंग! 

यात ‘खेल होबे’ या शब्दाची मिठाई बंगालमधील राजकीय धुळवड कशी सुरु आहे, हे दर्शवत आहे. कारण या शब्दाचा अर्थ ‘खेळ होणार’ असा होता. यातून निवडणुकीत कुणाचा खेळ होणार माहित नाही, पण या शब्दातून बंगालमधील निवडणूक किती गंभीर परिस्थितीतून पुढे सरकत आहे, त्याचा प्रत्यय येत आहे. तर दुसरीकडे ‘जय श्रीराम’ असे छापलेली मिठाईदेखील बाजारात आली आहे. त्यातून थेट भाजपचा प्रचार होत आहे. त्याचबरोबर ‘दीदी संदेश’, ‘मोदी संदेश’ या नावानेही मिठाई बाजारात आली आहे.

(हेही वाचा : अनुराग कश्यप, तापसीने ३५० कोटींचा कर बुडवल्याचा संशय  )

भाजप-तृणमूल थेट लढत! 

या ठिकणी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय प्रचारप्रसाराला जोर आला आहे. इथे भाजप आणि तृणमूल काँग्रेस अशीच थेट लढत होणार आहे. भाजपने येनकेन प्रकारेन राज्यात भगवा फडकवायचाच आणि बंगालमधून अल्पसंख्यक तुष्टीकरणाच्या राजकारणाला मुळापासून उखडून टाकायचे, असा निश्चय केला आहे. या ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी आहेत. त्यांच्याच नावाने प्रचार सुरु आहे, पण भाजपने अद्याप इथे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दिला नाही, त्यामुळे इथे भाजपचा निवडणुकीचा चेहरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत, त्यामुळे इथे लढत ही मोदी विरूद्ध दीदी अशी असल्याने ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक अवघड बनली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here