निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नुकत्याच लागलेल्या 4 राज्यांच्या निवडणूक निकालांवर मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी प्रशांत किशोर यांनी चार कारणेही दिली, ज्यामुळे भाजपचा तीन राज्यांत मोठा विजय झाला. फक्त नरेंद्र मोदींमुळेच भाजपला मते मिळत नाहीत, तर त्यांना मते मिळण्याची चार कारणे आहेत. हे काँग्रेसला समजून घ्यावे लागेल. फक्त आरोप करुन जनता कोणाला मत देत नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा मोठा विजय झाला. काहीजण या निकालाचे श्रेय पंतप्रधान मोदी यांना देत आहेत, तर काही जण काँग्रेसच्या अपयशामुळे भाजपला फायदा झाल्याचे बोलत आहेत, असे प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.
काय म्हणाले प्रशांत किशोर?
विरोधकांना भाजपचा पराभव करायचा असेल, तर त्यांना आधी त्यांची ताकद समजून घ्यावी लागेल. लोक भाजपला मत का देतात? जोपर्यंत तुम्ही त्यांची ताकद समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांना पराभूत करू शकत नाहीत. भाजपला मते मिळण्याची चार कारणे आहेत. पहिले म्हणजे हिंदुत्व ही त्यांची विचारधारा आहे, त्याच्याशी संबंधित एक मोठा वर्ग भाजपला मत देतो. दुसरे सध्या नव्या राष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली आहे. भारत विश्वगुरू झाल्याचे सर्वत्र ऐकायला मिळते. मोदींनी संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. दहशतवाद्यांचा खात्मा केला, या सर्व गोष्टी ऐकायला मिळतात. या राष्ट्रवादाच्या भावनेमुळेच भाजपला मते मिळतात. तिसरे केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांचा एक मोठा वर्ग, मग ती किसान स्वानिधी योजना असो, गृहनिर्माण योजना असो, त्यातील निधी थेट लाभार्थ्यांना दिला जातो. चौथे भाजपची संघटनात्मक ताकद खूप जास्त आहे. भाजपची संघटना आर्थिकदृष्ट्यादेखील खूप सक्षम आहे. या संघटनेसमोर इतर पक्षांनी आपली संघटना मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, अशी चार कारणे प्रशांत किशोर यांनी सांगितली. जोपर्यंत तुम्ही यावर काम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागेल, असे प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.
(हेही वाचा BJP : एकाच वेळी दोन मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा भाजपचा तेलंगणातील कोण आहे ‘जायंट किलर’?)
Join Our WhatsApp Community