लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवी दिल्ली येथे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सामील होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीहुन राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत महायुतीतील संभाव्य प्रवेशाबाबत भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुढील दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
मी गडचिरोलीतूनही लढेन
मनसेला महायुतीकडून ज्या जागा मिळतील त्यातील एका जागेवर बाळा नांदगावकर हे उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे. याबाबतही नांदगावकर यांनी खुलासा केला आहे. स्वत:च्या उमेदवारीबद्दल बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, मी याआधी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सांगितले तर मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. आम्हाला कानावर आदेश पडला की त्यानुसार कृती करण्याची सवय आहे. त्यामुळे राज ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ. मी उद्या पुन्हा राजसाहेबांसोबत चर्चा करणार आहे, असे नांदगावकर यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community