फोन टॅपिंग अहवालाबाबत फडणवीसांनी काय केला गौप्यस्फोट? वाचा… 

फोन टॅपिंगसंदर्भातील राज्य सरकारचा संपूर्ण अहवाल सदोष आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

80

रश्मी शुक्ला यांचा पोलीस दलातील बदल्यांच्या संदर्भात गोपनीय अहवालाने ठाकरे सरकारची झोप उडवली आहे. कालपर्यंत यावर एनसीपी अध्यक्ष शरद पवार हेच बोलत होते, आता गुरुवार, २५ मार्च रोजी यावर एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावर विरोधी पक्षावर उलट आरोप करत या अहवालात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते, मात्र त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी, २६ मार्च रोजी बोलताना फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केला नाहीच, तो जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी अहवाल तयार केला आहे, असा गौप्यस्फोट केला.

फोन टॅपिंग नियमानुसारच!

सीताराम कुंटे यांना आपण चांगले ओळखतो, ते अत्यंत सरळमार्गी आहेत, त्यांनी हा अहवाल बनवलेला नाही, त्यांना त्यावेळी केवळ सही करायला लावलेली आहे, असेही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला आणि भाजपवर करण्यात आलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक त्रुटी आहेत. जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न असेल तेव्हाच फोन टॅप करता येतात, असे अहवालात म्हटले आहे. पण कायद्यानुसार एखादा गुन्हा होण्याचा संशय असेल, तर फोन टॅपिंगची परवानगी असते. नेमकी हीच ओळ अहवालातून वगळण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडूनही याच कलमाखाली फोन टॅप केले जातात. त्यामुळे फोन टॅपिंगसंदर्भातील राज्य सरकारचा संपूर्ण अहवालच सदोष आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

(हेही वाचा : रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार? सरकारची तयारी सुरू!)

अहवाल नवाब मलिक यांनी फोडला! 

राज्यातील पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल हा मी फोडला नाही. मी या अहवालाचे केवळ कव्हरिंग लेटर वाचले होते, मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तो अहवाल प्रसारमाध्यमांना उपलब्ध करुन दिला. आता हेच नेते अहवाल फुटल्यामुळे काही अधिकाऱ्यांना मानसिक त्रास होत असल्याचे म्हणत आहेत. पण मी कव्हरिंग लेटर वगळता उर्वरित अहवाल लिफाफाबंद करुन केंद्रीय गृहसचिवांना सादर केला होता. याउलट नवाब मलिक यांनी या अहवालाची काही पाने प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे तो अहवाल नवाब मलिक यांनीच फोडला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच या अहवालात नमूद करण्यात आल्याप्रमाणेच ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी, असा शेरा मारला होता. मात्र, ही चौकशी कोणाच्या आदेशाने थांबवण्यात आली, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.