सर्व राजकीय विश्लेषकांचा टांगा पलटी घोडे फरार झालेला आहे. मोदी-शाह ही जोडी नेहमीच अनपेक्षित निर्णय घेते. भाजपाचे सर्व कार्यकर्ते खुश होते कारण पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. अचानक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपा मजबूत झालेला आहे. मग मोदी-शाह यांनी त्यांना दुय्यम वागणुक का केली असा प्रश्न सर्वांना पडला असेल. यात दोन तीन गोष्टी आहेत. दोन दिवसांपूर्वी मी ’एकनाथ शिंदेंचं बंड आणि मराठा लॉबी यांचा काही संबंध आहे का?’ या मथळ्याचा लेख लिहिला होता.
उद्धव ठाकरेंवर त्यांनी अतिरिक्त विश्वास ठेवला
या लेखाचा संदर्भ का दिला ते पुढे पाहू. आता आपण अडीच वर्षे मागे जाऊ. काही विश्लेषकांनी असं सांगितलं होतं की, अमित शाह यांना २०१९ मध्ये शिवसेनेशी युती मान्य नव्हती. कारण ते सतत भाजपावर आसुड ओढत होते. त्यांना उद्धव ठाकरेंच्या वागण्याबद्दल संशय होता. पण देवेंद्र फडणवीसांनी आग्रह धरला की आपण त्यांना नाराज नको करुयात. युती झाली आणि निवडणूकीनंतर अमित शाह यांचा संशय खरा ठरला. उद्धव ठाकरे पवारांच्या मदतीने आघाडीत सामील झाले. भाजपाची सत्ता गेली. देश चालवण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राची सत्ता अत्यंत गरजेची आहे. कारण देशाच्या आर्थिक नितीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असतो. महाराष्ट्रातच मुंबई महानगरपालिका येते आणि शिवसेनेला न दुखावण्यासाठी पालिका त्यांच्याकडे दिली. नाहीतर काही नगरसेवक गोळा करुन पालिकेवर भाजपाची सत्ता आणता आली असती.
देवेंद्र फडणवीसांचं जर काही चुकलं असेल तर ते म्हणजे उद्धव ठाकरेंवर त्यांनी अतिरिक्त विश्वास ठेवला. या विश्वासामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली. जर हे असंच घडलं असेल तर फडणवीसांना या गोष्टीची जाणीव करुन द्यायला हवी, असं केंद्रिय नेतृत्वाने ठरवलं असेल. लहान सहान चुकांमुळे मोठे परिणाम भोगावे लागतात.
आता दुसरी बाजू पाहू. उद्धव ठाकरेंनी गेली अडीच वर्षे कामे केली नाहीत, तरी पीआर आणि इतर लॉबीच्या माध्यमातून एक सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतरामुळे देखील हिंदुत्वाची सहानुभूती मिळवली. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करुन उद्धव ठाकरे यांनी मिळवलेली सहानुभूती आणि उरलासुरलेला हिंदुत्वाचा मुद्दा, सगळं काही हिरावून घेतलेलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंकडे मुद्दे उरलेले नाहीत.
आणखी एक गोष्ट म्हणजे मराठा लॉबी. कुणी कितीही नाकारलं तरी राजकारणातीय मराठा ही प्रमुख लॉबी आहे. मराठा समाजाने महाराष्ट्रासाठी त्यागही केलेला आहे. पण शरद पवारांनी या लॉबीचा चांगला वापर केला नाही. नारायण राणे भाजपामध्ये आलेच, त्याचबरोबर शिंदे या मराठा समाजातील नेत्याला मुख्यमंत्रीपद देऊन फडणवीस त्यागमूर्ती असल्याचे दाखवून दिले आहे. या घटनेमुळे मराठा समाज भाजपाच्या मागे उभा राहिल.
आता सर्वात महत्वाचा मुद्दा. महाविकासआघाडी सरकारने जी पोकळी निर्माण केली व जे भ्रष्टाचार आणि गुन्हे केले. ते सर्व आता बाहेर काढले जाणार आहेत. आता ही प्रकरणे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाहेर येणार आहेत. त्यामुळे भाजपा किंवा फडणवीस सूडाचं राजकारण करतात, असे आरोप करता येणार नाहीत. जे मोदी-शाह-फडणवीसांना करायचं आहे, तेच एकनाथ शिंदे करतील. म्हणजे समजा एखादा शिवसेनेचा नेता अडकला असेल, तर शिवसेनाच शिवसेनेवर कारवाई करेल.
…यामुळे नरेंद्र मोदी खूप दुखावले गेले होते
२०१९ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते आणि उद्धव ठाकरेंनी वेगळी चूल मांडली यामुळे नरेंद्र मोदी खूप दुखावले गेले. कृष्णाचं राजकारण समोर ठेवून ही खेळी खेळली गेली आहे. यामुळे एक राजकीय घराणं पूर्णपणे कोसळलं. आता त्यांचा यापुढे राजकारणात प्रभाव राहणार नाही. मातोश्रीचं महत्व यामुळे कमी झालेलं आहे. आता ते महत्व ठाण्याला प्राप्त होणार आहे. ठाणे हे शिवसेनेचं केंद्रस्थान राहिल. त्याचबरोबर उद्धव ठाकरे बाळासाहेबांना दिलेलं वचन विसरले, ते पवारांच्या नादी लागून स्वतः मुख्यमंत्री झाले आणि सामान्य शिवसैनिकावर अन्याय केला. पण फडणवीसांनी सर्वोच्च त्याग करुन शिंदे या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांना मानवंदना दिल असा संदेश त्यांनी जनतेला दिलेला आहे. तर दिल्लीतून सोडलेल्या एका बाणाने अनेक लक्ष्य साधले आहेत. राजकारण हे सोपं काम नाही. आणि वाह्यात बडबड करणे हे देखील राजकारण नाही. बुद्धिबळ खेळताना दोन्ही खेळाडू काहीही न बोलता खेळत असतात, हे अनेक जण विसरतात.
Join Our WhatsApp Community