रेमडेसिवीरवरुन रात्रीस खेळ चाले… काय घडलं रात्री? वाचून धक्का बसेल!

रविवारी दिवसभर या विषयावरुन राजकारण सुरू असताना, शनिवारी रात्री काय घडले हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

129

ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवार १७ एप्रिलच्या रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मध्यरात्रीच थेट विलेपार्ले पोलिस स्टेशन गाठले. मात्र नेमकं रात्री काय घडलं, हे जाऊन घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे रविवारी दिवसभर या विषयावरुन राजकारण सुरू असताना, शनिवारी रात्री काय घडले हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट…

मुंबई पोलिस आयुक्तांचा फोन सायलेंट मोडवर?

पोलिस ठाण्यात या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर त्यांनी आपला फोन काढला आणि थेट मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना फोन लावला. मात्र, तब्बल पाच वेळा फोन लावून देखील नगराळेंनी फडणवीस यांचा फोन न उचचल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. एवढेच नाहीतर तुमचे पोलिस आयुक्त झोपले असतील, म्हणून त्यांनी माझा फोन उचलला नसावा, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावल्याचे समजते.

पोलिस स्टेशनमध्ये नेमके काय घडले?

पोलिस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले होते. संतापलेल्या फडणवीसांनी हे योग्य नसल्याचे म्हटले. मी तुम्हाला दोष देत नाही, पण तुम्ही केलेली गोष्ट योग्य नाही. ते (डोकानिया) आम्हाला रेमडेसिवीर द्यायला निघाले आहेत आणि तुम्ही त्यांना ताब्यात घेतले आहे. पत्र देता आणि त्यांना उचलून आणता? हे बिलकूल योग्य नाही. त्यांना धमकी देण्यात आली आहे. ही धमकी आम्ही टेप करुन ठेवली आहे, असे फडणवीस मंजूनाथ शिंगे या पोलिस अधिकाऱ्यांना म्हणाले. त्यावर मला काही याची कल्पना नव्हती सर, हा काही प्लान वगैरे नाही, असे सांगत शिंगे यांनी फडणवीसांना समजावण्याचा प्रयत्न केला. डोकानिया यांना परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी 6 वाजता त्यांना परवानगी देण्यात आली. मग तुम्ही त्यांना अटक का केली? असा सवाल फडणवीस आणि दरेकर यांनी शिंगे यांना केला. त्यावर शिंगे यांच्याकडून पुन्हा फडणवीसांची समजूत काढण्यात आली.

(हेही वाचाः महाराष्ट्राला रेमडेसिवीर देणा-या कंपनीच्या संचालकांची पोलिसांकडून चौकशी! फडणवीस आणि दरेकरांची पोलिस ठाण्यात धाव)

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने झटकले हात

डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सांगण्यावरुन उचलण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र ऐनवेळी अन्न व औषध प्रशासना(एफडीए) ने हात वर केल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली अन् पोलिसांना कायदेशीर कागदपत्राच्या आधारे डोकानिया यांना साेडून द्यावे लागले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मंजूनाथ शिंगे यांनी एफडीएनेच दिलेल्या माहितीच्या आधारे डोकानिया यांना उचलले. मात्र ऐनवेळी एफडीएने हात वर केल्याने मंजूनाथ शिंदे मात्र अडचणीत सापडले. देवेेंद्र फडणवीस यांनी याबद्दल पोलिसांना जाब विचारला असता, मंजूनाथ शिंगे यांची बोलती बंद झाली. मग विश्वास नांगरे पाटील यांनी यात मध्यस्थी केल्याची माहिती मिळत असून, मंजूनाथ शिंगे यांनी माफी मागितल्याचीही माहिती मिळत आहे.

इंजेक्शनच्या साठ्याचे हे आहे खरे कारण?

डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावल्याचे जरी पोलिस सांगत असले, तरी इतका साठा कसा झाला याचे खरे कारण देखील आता समोर येऊ लागले आहे. केंद्राने रेमडेसीवरच्या निर्यातीवर बंदी घातल्याने डोकानिया यांच्या कंपनीने निर्यातीसाठी तयार केलेले इंजेक्शन कार्गोकडे पडून होते. डोकानिया यांनी ही इंजेक्शन महाराष्ट्राला देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना गुजरातच्या एफडीएचे आणि महाराष्ट्राच्या एफडीएच्या परवानगीचे पत्र महत्त्वाचे होते. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांना हे पत्र संध्याकाळी ६ वाजता दिल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः गुजरातमधून महाराष्ट्राला ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शन!)

दोन विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का?- मलिक

राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस, दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि स्थानिक आमदार पराग अळवणी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांना काही माहिती मिळाली तर ते चौकशीसाठी बोलावत असतात. काळाबाजार रोखणं हे पोलिसांचं काम आहे. पण ब्रुक फार्मा कंपनीच्या या मालकासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते थेट पोलिस ठाण्यात गेले. एखादी काही घटना घडली तर विरोधी पक्षनेते फोनवरुन माहिती घेत असतात. पोलिसांशी चर्चा करत असतात. पण प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जात नाहीत. मात्र फडणवीस, दरेकर गेले. डोकानियाला पोलिसांनी चौकशीला बोलावलं म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीस पेशाने वकील आहेत, ते डोकानियांचं वकीलपत्र घेऊन बाजू मांडत होते की त्यांच्याशी संबंध आहेत म्हणून बाजू मांडत होते?, विरोधी पक्षनेत्यांचा डोकानियाशी संबंध काय?, असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहेत.

नेमका वाद काय?

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर हे थेट दमणच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून 50 हजार इंजेक्शन्स महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.