महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत कीर्तनकार चारुदत्त आफळे, ज्येष्ठ लेखक व व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, त्यांचे सुपुत्र डॉ. परीक्षित शेवडे, दुर्गेश परुळकर, पार्थ बावीस्कर, अॅड. श्रीराम ठोसर असे सावरकर अभ्यासक उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर होत असलेल्या खोट्या आरोपाचे खंडण करण्यासाठी आणि वीर सावरकरांची महती लोकांना कळावी यासाठी हर घर सावरकर अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी मांडला.
आता वीर सावरकरांचा विषय राहुल गांधी यांनी राजकीय पातळीवर ऐरणीवर आणला. बिच्चारे राहुल यांनी असे शापीत राजकुमार आहेत, जे करायला जातात एक आणि होते भलतेच. त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्याकडूनच हिंदू द्वेषाचा आणि सावरकर द्वेषाचा वारसा राहुल गांधी यांना मिळाला आहे. ते स्वतःला सावरकरांचा सर्वात मोठा विरोधक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु हवा भरुन फुगवलेली बेडकी किती काळ टिकणार? असो. आता हर घर सावरकर अभियान राबवण्यात येणार आहे. सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडला असेल की हर घर सावरकर म्हणजे काय? प्रत्येकाच्या घरात सावरकर न्यायचे म्हणजे नेमके काय करायचे? हर घर तिरंगा अभियान खूप गाजले. मी एका संस्थेसाठी सावरकरांवरील विशेषांकाचे काम पाहत होतो. तेव्हा ‘घराघरात सावरकर, मनामनात सावरकर’ ही टॅगलाईन जन्माला आली. ‘हर घर सावरकर’ या वाक्याचा अर्थ असाच आहे. सावरकर घराघरात पोहोचले पाहिजेत आणि मनामनात पोहोचले पाहिजेत.
(हेही वाचा औरंगजेब धर्मनिरपेक्ष नव्हताच; मंदिरे पाडण्याचे दिलेले आदेश)
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एकूण दृष्टीकोण हा देशभक्तीचा व हिंदुत्वाचा होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र आणि साहित्य अभ्यासताना आपल्या लक्षात येते की, भारताचे भावविश्व हिंदू राहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. कारण भारताचे भावविश्व हिंदू राहिले नाही तर बलात्कारासह रक्तरंजित फाळणीला सामोरे जावे लागते. पण भारताचे भावविश्व हिंदू राहिले तर सर्व समाजातील लोक गुण्यागोविंदाने नांदतात. त्यामुळे हर घर सावरकर म्हणजे प्रत्येक घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणे, प्रत्येकाच्या मनात आपल्या देशाबद्दल जाज्वल्य अभिमान निर्माण करणे, वेळ पडल्यास देशासाठी कार्य करण्यास सिद्ध असणे, प्रत्येकामध्ये एकच तत्व आहे ही भावना जागृत करणे, जेणेकरुन प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहील. त्यामुळे हर घर सावरकर म्हणजे सावरकरांचे चरित्र आणि साहित्य घराघरात पोहोचवणे इतका मर्यादित हेतू नसून त्यातून अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. देश सुजलाम सुफलाम बनवण्यास या अभियानामुळे हातभार लागणार आहे.