कुर्ला येथील मिठी नदीतून एनआयएने मनसुख हिरेन प्रकणातील बरेच पुरावे बाहेर काढले आहेत. या पुराव्यांमध्ये एनआयएला एकाच क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट आढळून आल्या आहेत. या नंबर प्लेट औरंगाबाद येथून चोरीला गेलेल्या गाडीच्या असल्याची माहिती समोर आली आहे. कार चोरी प्रकरणी नोव्हेंबर २०२० रोजी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा दावा गाडीच्या मालकाने केला आहे.
असा लागला गाडीच्या मालकाचा शोध
एनआयएचे पथक रविवारी सकाळी सचिन वाझेला घेऊन कुर्ल्यातील मिठी नदीवर आले होते. त्यावेळी एनआयएच्या सोबत असलेले पाणबुडे(पोहणारे) यांना नदीच्या पात्रात उतरवण्यात आले. त्यांनी नदीतून एक सीपीयू, लॅपटॉप, डीव्हीआर, हार्डडिक्स आणि एकाच क्रमांकाच्या दोन नंबर प्लेट नदीतून बाहेर काढल्या. वाझे याने गुन्हयातील पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने या सर्व वस्तू मिठी नदीत टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान एनआयएने गाडीच्या नंबरप्लेट वरुन गाडी मालकाचा शोध घेतला असता, हा गाडीचा मालक औरंगाबाद येथे राहणारा असल्याचे एनआयएच्या लक्षात आले. विजय नाडे असे या गाडी मालकाचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्या नंबर प्लेट ओळखल्या असून त्या त्याच्या गाडीच्या असल्याचे एनआयएला सांगितले.
(हेही वाचाः वादात सापडलेले मुंबई पोलीस प्रशासन कोण-कसे चालवते? जाणून घ्या!!)
गाडीचा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाशी संबंध?
माझी गाडी नोव्हेंबर २०२० या महिन्यात चोरीला गेली होती. याप्रकरणी औरंगाबाद येथील चौक पोलिस गाठण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, तक्रारीची दुसरी प्रत आपल्याकडे असल्याचे नाडे यांनी एनआयएच्या चौकशीत सांगितले आहे. एनआयएच्या पथकाने मिठी नदीतून काढलेल्या या सर्व वस्तू तपासणीसाठी पुण्याच्या न्यायवैधक विज्ञान प्रयोगशाळा या ठिकाणी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत. औरंगाबाद येथील चोरीला गेलेल्या गाडीचा मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाशी काही संबंध आहे याचा तपास सुरू असून, चोरीला गेलेल्या गाडीचा शोध घेण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community