बाळासाहेबांची सावली शिंदेंची झाली; चंपासिंह थापा यांच्या शिंदे गट प्रवेशाचा काय अर्थ आहे?

132

चंपासिंह थापा हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही. थापा हे बाळासाहेबांची सावली म्हणून ओळखले जातात. ते मातोश्रीवर राहत होते. बाळासाहेबांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, त्यांची काळजी घेणारे, बाळासाहेबांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या सोबत असणारे चंपासिंह थापा आता एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

( हेही वाचा : गुजरातचे दोन सिंह येणार महाराष्ट्रात )

पहिली गोष्ट ते बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक असले तरी त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यांनी कधी राजकीय विधाने केली नाही, त्यांचे स्वतःचे असे राजकीय समर्थक व कार्यकर्ते नाही. मग प्रश्न असा पडतो की शिंदेंनी उठाव केल्यानंतर ते शिंदे गटात जाऊन करणार तरी काय आहेत? आणि त्यांच्या जाण्याने कोणता फरक पडणार आहे? कारण यापुढेही ते राजकारणाच्या रिंगणात आपल्याला दिसणार नाहीत.

आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, जे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत त्यांना ठाकरे गद्दार म्हणत आहेत. बरं हे सोडून जाणारे लोक बाळासाहेबांना आपले आदर्श मानतात आणि आपण बाळासाहेबांचा वारसा पुढे चालवत आहोत असं म्हणतात. त्याविरोधात ठाकरे गट आहे. ज्या सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्याविरुद्ध लढण्यात बाळासाहेबांनी जीवाचं रान केलं, त्याच्या बरोबर ठाकरेंनी आघाडी केली. संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांशी बाळासाहेबांचं वैचारिक वैर होतं, त्यांच्याशीही उद्धव ठाकरेंनी आघाडी केली. जे जे बाळासाहेबांना नको होतं, ते ते उद्धव ठाकरेंनी केलं आणि त्याचा परिणाम म्हणून बाळासाहेबांशी निष्ठा दाखवणारे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंपासून दूर गेले.

शिंदेंनी उठाव केल्यानंतर ठाकरे सरकार पडलं आणि शिंदे सरकार आलं. त्यानंतरही शिंदे गटात इनकमिंग सुरुच राहिली. मुंबईतले अर्धे नगरसेवक जरी शिंदे गटात गेले तरी शिंदेंनी जवळजवळ महापालिकेचं युद्ध जिंकलंच समजा. या पार्श्वभूमीवर चंपासिंह थापा यांच्या शिंदे गट प्रवेशाचा काय अर्थ आहे? चंपासिंह थापा नेते नाहित, कुणाला प्रभावित करतील अशी व्यक्ती देखील नाही.

शिवसैनिक मात्र आत्मपरीक्षण करु शकतात

परंतु थापा हे निष्ठेचं आणि सेवेचं प्रतीक आहे. ते ईडीला घाबरुन गेले असंही म्हणता येत नाही. आता त्यांच्यावर पैशांसाठी शिंदे गटात गेले असल्याचा आरोप होतोय. पण हे विधान जरा जास्तच गंभीर आहे. या विधानाचा अर्थ असा होतो की ठाकरेंकडे असणारे लोक पैशांसाठी असतात, निष्ठेसाठी नसतात म्हणून जास्त पैसे मिळाले की ते दुसर्‍यांकडे जातात. अशी विधाने करुन आपण नकळत कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करत आहोत याचंही भान काहींना उरलेलं नाही.

थोडक्यात काय तर चंपासिंह थापा यांच्यासारखे निष्ठावंत सेवक जर ठाकरेंना सोडून शिंदेंकडे जात असतील तर ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. उद्धव ठाकरे हे आत्मपरीक्षण कधीच करणार नाहीत. पण शिवसैनिक मात्र आत्मपरीक्षण करु शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.