Ayodhya Shri Ramlala Pratishtha : श्रीरामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काय म्हणतात पाकिस्तानची प्रसारमाध्यमे?

420

अयोध्या नगरीतील श्रीराम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Shri Ramlala Pratishtha)  करण्यात आल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. भारतीय आणि परदेशी माध्यमांमध्येही प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तान आणि कतारसारख्या देशांच्या प्रसारमाध्यमांनीही याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात दिवाळी साजरी केली जात आहे. भारतासोबतच परदेशातही रामलला यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची (Ayodhya Shri Ramlala Pratishtha) जोरदार चर्चा होत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांनी याबद्दल लिहिले आहे की, ‘आज पंतप्रधान बाबरी मशीद पाडून बांधलेल्या श्रीराम मंदिरात पंतप्रधान मोदी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

पाकिस्तानातील आघाडीचे वृत्तपत्र ‘द डॉन’ने एक अभिप्राय लेख प्रकाशित केला आहे, ज्यात लेखक परवेझ हुडभॉय यांनी लिहिले आहे की, जिथे पाच शतके जुनी बाबरी मशीद उभी होती, आता तिथे राम मंदिर बांधले जात आहे. राम मंदिराभोवती व्हॅटिकन सिटीसारखे शहर तयार झाले आहे.

‘भारतीय मुस्लिमांनी हे विसरू नये…’

या लेखात पुढे लिहिले आहे की, ‘हिंदुत्वाचा संदेश दोन वर्गांना लक्ष्य करतो. पहिले म्हणजे भारतातील मुस्लिम, ज्याप्रमाणे पाकिस्तान आपल्या हिंदू लोकसंख्येला कमी अधिकार असलेले द्वितीय श्रेणीचे नागरिक मानतो, त्याचप्रमाणे भारतातील मुस्लिमांनी हे कधीही विसरू नये की ते आक्रमकांची अनेच्छिक मुले आहेत, ज्यांनी प्राचीन भूमी नष्ट केली आणि लुटली.
पाकिस्तानी वृत्तपत्राने पुढे लिहिले आहे की, मार्च 2023 मध्ये ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या जमावाने एक शतक जुना मदरसा आणि एक प्राचीन ग्रंथालय जाळले होते. 12व्या शतकात मुस्लिम आक्रमक बख्तियार खिलजीने नालंदा विद्यापीठाला आग लावली आणि तेथील प्रचंड ग्रंथालय नष्ट केले. हिंदुत्ववाद्यांनी मदरसा आणि लायब्ररी जाळणे ही ‘टिट फॉर टॅट’ असल्याचे वृत्तपत्राने लिहिले आहे.

(हेही वाचा Shri Ramlala pratishthapana :  श्रीरामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे मनमोहक क्षणचित्रे )

हिंदुत्वाच्या दुसर्‍या लक्ष्याचा संदर्भ देत या लेखात लिहिले आहे की, ‘दुसरा संदेश भाजपचा विरोधक काँग्रेससाठी आहे, त्यांनी धर्मनिरपेक्षतेचे राजकारण सोडून धार्मिक पातळीवर येऊन भाजपसोबत राजकारण करावे, अन्यथा काँग्रेसकडे हिंदुविरोधी म्हणून पाहिले जाईल.

‘राम मंदिराच्या आश्वासनामुळे भाजपला सत्तेत येण्यास मदत झाली आणि…’ 

पाकिस्तानी वृत्तपत्र पाकिस्तान टुडेने लिहिले आहे की, लाखो भारतीय रामाचे जन्मस्थान मानत असलेल्या ठिकाणी सोमवारी एका विशाल मंदिराचे उद्घाटन (Ayodhya Shri Ramlala Pratishtha) करण्यात आले. गेल्या 35 वर्षांपासून मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मोदींच्या हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाने मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांच्यासाठी हा नेहमीच राजकीय मुद्दा राहिला आहे, ज्यामुळे पक्षाला सत्तेवर येण्यास आणि येथे राहण्यास मदत झाली आहे.

वृत्तपत्राने लिहिले की, शतकानुशतके मुस्लिम आणि वसाहतवादी सत्तेच्या अधीन राहिलेला हिंदू जागृत झाला आहे, असे अयोध्येतील समारंभ प्रतीत करत आहे. मे महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदींच्या निवडणूक प्रचाराचा आभासी प्रारंभ म्हणूनही या सोहळ्याकडे पाहिले जात आहे.

वृत्तपत्राने लिहिले आहे की, मंदिराची जागा अनेक दशकांपासून वादाचे केंद्र बनली आहे कारण हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बाजूंनी त्यावर आपला दावा ठेवला आहे. 1992 मध्ये हिंदूंच्या जमावाने 16व्या शतकात बांधलेली बाबरी मशीद पाडली. भारतातील बहुसंख्य हिंदू म्हणतात की हे ठिकाण भगवान रामाचे जन्मस्थान आहे आणि 1528 मध्ये मुस्लिम मुघलांनी एक मंदिर पाडले आणि बाबरी मशीद बांधली. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही जमीन हिंदूंना दिली आणि मुस्लिमांना स्वतंत्र भूखंड देण्याचे आदेश दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.