शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे कायमंच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. भाजपवर टीका करताना त्यांच्या टीकेची धार ही जास्तच तीक्ष्ण होते. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरच संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटची सध्या चर्चा होत आहे.
कधी कधी मौन हेच सर्वात चांगलं उत्तर असल्याचं राऊतांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या ट्वीटमागचं नेमकं कारण काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भाजप नेत्यांनी त्यांच्याबाबत गेल्या काही दिवसांत केलेली विधानंच, राऊतांच्या या ट्वीटमागचे कारण असल्याचा तर्क आता राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहे.
कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं… pic.twitter.com/nPT5N6LMTl
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2022
(हेही वाचाः शरद पवार होणार यूपीएचे अध्यक्ष?)
राऊतांना महत्व का देता?- फडणवीस
संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना चांगलाच टोला हाणला. संजय राऊतांना इतकं महत्व का देता? ते कोणी सरकारचे प्रमुख, विश्ववेत्ता किंवा फिलॉसॉफर आहेत का? रोज-रोज त्यांच्याबद्दल मला का विचारता? ज्यांच्या विचारांना सर्वोच्च न्यायालयाने कच-याच्या पेटीत फेका असं सांगितलं, त्यांच्याविषयी मला विचारून तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत असल्याची खोचक टीका फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना केली होती. त्यांच्या या टीकेबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या.
दिवा विझण्यापूर्वी फडफडतो- पाटील
फडणवीसांनी दिलेल्या या प्रतिक्रियेप्रमाणेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांच्याबाबत काहीही बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. त्यांच्यावर बोलून आपण त्यांना खूप मोठं करतो. रोज सकाळी ते प्रवचन देतात, त्यांना ते खुशाल देऊ दे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो, असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.
(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष)
…म्हणून स्वीकारलं मौन?
राज्यात शिवसेनेचे अनेक नेते हे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. स्वतः संजय राऊत, मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक हे देखील यातून सुटले नाहीत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपच्या इशारावर चालत असल्याचा आरोप सातत्याने संजय राऊत करत आहेत. त्यामुळेच भाजप नेत्यांच्या या टीकेमुळे तर राऊतांनी मौन व्रत स्वीकारलं नाही ना, असंही सध्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
Join Our WhatsApp Community