राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या 5 आणि 6 जुलै रोजी होणार असून, दोन दिवसांच्या या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवड होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र आता याच अधिवेशनात ही निवड होण्याची शक्यता असून, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच तशी माहिती दिली आहे.
काय म्हणाले थोरात?
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याच पावसाळी अधिवेशनात आमचा अध्यक्ष होईल, असे सांगितले आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया 5 तारखेला सुरू होईल आणि 6 तारखेला संपेल, असे देखील ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पावसाळी अधिवेशनात व्हावी अशी सुरुवातीपासून काँग्रेसची मागणी होती. मात्र फक्त दोन दिवसांच्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक नको, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका होती. आता काँग्रेसच्या दबावापुढे शिवसेना-राष्ट्रवादी झुकली असून, पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचाः विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार? राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल)
पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत असून, आता पावसाळी अधिवेशनातच अध्यक्ष निवडावा, असे मत या दोन्ही नेत्यांचे झाले आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरुन विधानसभा अध्यक्ष निवडीचा तिढा लवकर सोडवावा, असे सांगितले होते.
(हेही वाचाः दोन दिवसांचे अधिवेशन कोरोनासाठी की बचावासाठी?)
म्हणून शिवसेनेने काढला व्हिप
विधानसभा अध्यक्ष याच पावसाळी अधिवेशनात निवडावा असे तिन्ही पक्षांचे मत झाल्याने शिवसेनेने काल आपल्या आमदारांना व्हिप देखील जारी केला आहे. पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा व्हिपच शिवसेनेच्या सर्व आमदारांना जारी करण्यात आला आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करुन मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश शिवसेनेने काढला आहे. शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालय या पत्राद्वारे शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे देखील आपआपल्या आमदारांना व्हिप जारी करतील, अशी माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडी, शिवसेना आमदारांना व्हिप जारी)
मुख्यमंत्र्यांचा आधी नकार, आता होकार
दोन दिवसांच्या अधिवेशनासाठी निवडणुकीची रिस्क का घ्यावी, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे होते. मात्र मंगळवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हाच महत्वाचा मुद्दा होता. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही याच अधिवेशनात झाली पाहिजे. जेणेकरुन अध्यक्षांची निवड झाली म्हणजे मतभेदांच्या ज्या चर्चा आहेत त्या संपुष्टात येतील, असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना समजावले आहे.
(हेही वाचाः असे असणार दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन)
Join Our WhatsApp Community