मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर येताच गुवाहाटी पाठोपाठ अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्या राज्यात महाराष्ट्र भवन कधी उभारणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाशीमध्ये भव्य असे ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा प्रस्ताव गेल्या २५ वर्षांपासून धूळखात आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईतील वाशीमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी भूखंड आरक्षित करूनही, आजपावेतो त्यावर एकही वीट रचली गेलेली नाही.
राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार अस्तित्वात असताना, १९९८ मध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सिडकोमार्फत वाशीमध्ये आठ हजार चौरस स्क्वेअर मीटरचा भूखंड आरक्षित करण्यात आला. खेड्यापाड्यातून मुंबई किंवा आसपासच्या ठिकाणी शिक्षण, नोकरीसाठी येणाऱ्या युवकांना आधार होईल किंवा काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना थांबता यावे, यासाठी वाशीमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची योजना होती. मात्र, सरकारी अनास्थेमुळे ही फाईल २५ वर्षांपासून धूळखात पडून आहे.
वाशीमध्ये १९ राज्यांचे भवन
नवी मुंबईतील वाशी परिसरात २००५ पासून ते २०२१ पर्यंतच १६ वर्षांच्या कालावधीत तब्बल ११ राज्यांनी त्यांची कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य इमारती उभ्या केल्या आहेत. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब, अरुणाचल, गोवा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, गुजरात, ओडिशा, नागालँड, मेघालय, उत्तराखंड, मिजोरम, छत्तीसगड आणि सिक्कीम आदी राज्यांचा यामध्ये समावेश आहे. तेथील राज्यातून विविध कामांसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना या वास्तूंचा मोठा आधार मिळतो. त्या त्या राज्यांची सांस्कृतिक अस्मिता जपण्याचे काम देखील या भवनांमधून होत असते.
आरक्षित भूखंडाचा असाही वापर
वाशीमध्ये महाराष्ट्र भवनासाठी आरक्षित केलेल्या आठ हजार चौरस स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर अद्यापि एका फुटाचेही बांधकाम झालेले नाही. सिडको सोयीनुसार विविध कार्यक्रम, तसेच पार्किंगसाठी या जागेचा वापर करते. सरकारने ही वास्तू सिडको, सार्वजनिक बांधकाम तसेच अन्य विभागाने बांधावी यासंदर्भात कोणतीही सूचना केलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न थंड बस्त्यात पडला आहे.