ती सध्या काय करतेय? अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेतत्री तेजश्री प्रधान हिचा हा गाजलेला सिनेमा. हा सिनेमा जितका गाजला तितकेच या सिनेमाचे नाव देखील चर्चेत राहिले. आता तुम्ही म्हणाल मध्येच हा सिनेमा का आठवला? आणि तोही इतक्या दिवसांनंतर… अहो त्याचे कारणच तसे आहे की राव. जसं या सिनेनाम ती सध्या काय करतेय हा विषय चर्चेचा होता, तसाच सध्या राजकारणात आणि विशेषत: सत्तेत असलेल्या शिवसेनेमध्ये देखील, शिवसेनेचे ‘ते’ सध्या काय करतात असा सवाल सध्या जोर धरत आहे. आता तुम्ही म्हणाल शिवसेनेचे हे ‘ते’ म्हणजे कोण? हे नेते म्हणजे गेली अनेक वर्ष शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुलर्क्षित झालेले शिवसेनेचे आजी-माजी मंत्री, तसेच बाळासाहेबांचे कडवट ‘शिवसैनिक’… काय आहेत त्यांची नावे? याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट…
दिवाकर रावते
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री… बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक असलेले दिवाकर रावते हे शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही मंत्रिमंडळात नाहीत. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला थेट डावलण्यात आल्याने तेव्हा जुन्या जाणत्या शिवसैनिकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. तेव्हापासूनच नाराज असेलेले दिवाकर रावते आता फासरे पक्षात सक्रीय दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच शिवसैनिकांना सध्या रावते नेमके काय करत असतील, असा प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री शिवसेनेचा, मात्र अर्थसंकल्पात मराठीसाठी काहीच नाही. मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि त्यांनी विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं? तर मी त्यांना काय उत्तर देऊ?, असा सवाल उपस्थित करत रावतेंनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे एकूणच शिवसेनेवर नाराज असेलले हे ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी मंत्री सध्या राजकीय व्हिजन वासात तर गेले नाहीत ना? असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होऊ लगला आहे.
(हेही वाचाः आता रावतेही शिवसेनेवर नाराज…मेल्यावर साहेबांना काय उत्तर देऊ? रावतेंचा सवाल)
रामदास कदम
शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ओळख असेलेले रामदास भाई सध्या काय करतात, असा प्रश्न जर शिवसैनिकांना पडला तर नवल वाटायला नको. फडणवीस सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री असलेल्या रामदास भाईंना स्वत:च्या पक्षाचे आणि विशेषत: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही मंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले. तेव्हापासूनच रामदास कदम हे पक्षावर नाराज आहेत. पक्षाच्या कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात रामदास कदम सहभाग घेताना दिसत नाहीत. इतकंच नाही तर एरव्ही मातोश्रीवर थेट जाणाऱ्या रामदासभाईंनी आता मातोश्रीकडे देखील पाठ फिरवल्याची चर्चा आहे. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या रामदास कदम यांनी, थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्याच पक्षाच्या मंत्र्याला धारेवर धरले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम डावलून विविध कार्यक्रमांना परवानगी देणाऱ्या आणि राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कदम यांनी केली. एका शिवसेनेच्या मंत्र्यांचा वरदहस्त असल्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करत कदमांनी थेट पक्षालाच घरचा आहेर दिला होता.
(हेही वाचाः कोरोनाचा नियम मोडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मंत्र्यांचे अभय; सेना आमदाराचा घरचा आहेर)
रवींद्र वायकर
मातोश्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जवळचे, अशी रवींद्र वायकर यांची ओळख. मात्र माजी गृहनिर्माण राज्यमंत्री असेलेल्या वायकरांना ठाकरे सरकारमध्ये मात्र मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. वायकरांची नाराजी बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयाचा समन्वयक म्हणून केली. मात्र त्यानंतर विरोधकांकडून आक्षेप घेतला गेल्याने ही नियुक्ती देखील रद्द झाली. त्यानंतर त्यांची आमदार आणि खासदारांचा समन्वयक म्हणून नेमणूक केली. पण सध्या कुठल्याही बैठका होत नसल्यामुळे, वायकर सध्या आपल्या मतदारसंघातच राहणे पसंत करत आहेत. एवढेच नाही तर ते सध्या फारसे पक्षात सक्रीय देखील नाहीत.
(हेही वाचाः शिवसेनेचे आमदार ‘वादळ’ निर्माण करण्याच्या तयारीत!)
दीपक केसरकर
राणेंचे कट्टर विरोधक असलेल्या दीपक केसरकर यांनी २०१४ विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला. ते सावंतवाडी मतदारसंघातून जिंकून देखील आले. त्यानंतर त्यांना भाजप-शिवसेनेच्या सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देखील देण्यात आले. गृह राज्यमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांना मात्र, आता ठाकरे सरकार राज्यात आल्यानंतर मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले. तेव्हापासून दीपक केसरकर नाराज असून, सध्या ते पक्षात देखील फारसे सक्रीय नाहीत.
(हेही वाचाः तळ कोकणात राणेंचा दबदबा पुन्हा वाढला, शिवसेनेला लागली ‘घरघर’!)
तानाजी सावंत
मंत्रीपद न दिल्याने माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत प्रचंड नाराज होते. त्यांनी आपली नाराजी शिवसेनेच्या बैठकांकडे पाठ फिरवून दाखवली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ब्रेक दि चेन वरुन त्यांनी प्रशासनाला लक्ष्य केले होते. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मंत्रिमंडळ आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ नाही. जे काही नियोजन केले जाते ते फक्त कागदावर आहे, त्यामुळे ब्रेक दि चेन हे मुख्यमंत्र्याचे स्वप्न मुंबईत बसून साकार होणार नाही. त्यासाठी ग्राउंड लेव्हलला काम करावे लागेल, अशी टीका त्यांनी केली होती. तसेच आता तब्बल 19 महिन्यांपासून सोलापूरकडे दुर्लक्ष केलेल्या तानाजी सावंत यांनी 12 मे रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्यांनी घेतल्या. त्यामुळे तानाजी सावंत हे तब्बल दीड वर्षानंतर सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे.
प्रताप सरनाईक
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर शिवसेनेवर टीका करणाऱ्या कंगना राणावत आणि रिपब्लीक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर प्रताप सरनाईकांनी सणकून टीका केली. मात्र ईडीच्या रडारवर आल्यानंतर ते पुरते शांत झाल्याचे पहायला मिळत आहे. एरव्ही विरोधकांवर टीका करणारे प्रताप सरनाईक, आता शिवसेनेवर इतके आरोप होत असताना शांत का बसलेत? तसेच ते सध्या नेमकं काय करतात, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
(हेही वाचाः प्रताप सरनाईक गायब! किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप )
चंद्रकांत खैरे
प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेतर्फे राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. यावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे नाराज असून, त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवसेनेचा औरंगाबादमधून खासदार व्हावा हे आदित्य यांना आवडले नाही, अशी टीका चंद्राकांत खैरे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक म्हणून चंद्रकांत खैरै यांची ओळख आहे. पण ते देखील सध्या पक्षीय राजकारणापासून दूर गेल्याचे पहायला मिळत आहे.
संजय राठोड
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एवढेच नाही तर संजय राठोड यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर नाराज झाले होते. म्हणूनच पक्षाची आणखी बदनामी नको, म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला. मात्र तेव्हापासून संजय राठोड हे फारसे पक्षात सक्रीय दिसत नाहीत. तसेच ते देखील सध्या काय करतात, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
(हेही वाचाः संजय राठोडांचे शक्तीप्रदर्शन कोरोनाला मिळाले निमंत्रण! )
Join Our WhatsApp Community