उद्धव ठाकरेंसोबतचे २५ माजी नगरसेवक कुठे?

170

मुंबई महापालिकेतील महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील निधी वाटपाबाबत पालकमंत्र्यांना दिलेल्या अधिकाराबाबत महापालिका आयुक्त तथा पालकमंत्र्यांची भेट घेतली. उध्दव ठाकरे यांच्या गटाने तातडीने सर्व माजी नगरसेवकांना महापालिकेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रत्यक्षात ९० माजी नगरसेवकांपैकी केवळ ६० ते ६५ माजी नगरसेवकच उपस्थित राहिले. त्यामुळे ठाकरेंनी सांगूनही तब्बल २५ नगरसेवक महापालिका मुख्यालयात उपस्थित न राहिल्याने नक्की हे माजी नगरसेवक कुणीकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

६० ते ६५ माजी नगरसेवकच उपस्थित राहिले

मुंबई महानगरपालिकेमधील प्रभागांमध्ये विविध पायाभूत मूलभूत व नागरी सुविधा तसेच विकासकामे करण्याकरीता प्रशासक म्हणून आपल्या अधिकाराखाली निधीची तरतूद करण्याच्या मागणीसाठी माजी सभागृहनेत्या विशाखा राऊत व माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. या भेटीसाठी पक्षाच्या सर्व माजी नगरसेवकांना महापालिका मुख्यालयात साडेतीन वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. त्यामध्ये केवळ ६० ते ६५ माजी नगरसेवक उपस्थित राहिले. महापालिकेचे शिवसेनेचे ९७ नगरसेवक होते. त्यातील माजी नगरसेवक यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, आत्माराम चाचे, संतोष खरात आणि परमेश्वर कदम आदी सहा नगरसेवक हे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सुमारे ९१ माजी नगरसेवक हे उध्दव ठाकरे यांच्यासमवेत असून प्रत्यक्षात तातडीने महापालिकेत आयुक्तांची भेट घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीलाही हे माजी नगरसेवक उपस्थित राहिले नाही. तब्बल ६० ते ६५ माजी नगरसेवकच उपस्थित राहिले होते. तर बाकीचे माजी नगरसेवक हे गैरहजर राहिल्याने ते नक्की उध्दव ठाकरेंसोबत की शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा शतजन्म शोधिताना… समग्र सावरकर अनुभवताना सभागृह झाले सावरकरमय)

उध्दव ठाकरेंच्या गटाला निधी वाटपात पक्षपाताची भीती

आपण सन २०२३ २४ ह्या आर्थिक वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात स्थायी समिती स्तरावर व महानगरपालिका आयुक्त स्तरावर निधीवाटपाचा अधिकार प्रशासक म्हणून आयुक्तांनाआहे. असे असतानाही आमदार व खासदारांकडून आपण निधीवाटपा संदर्भात पत्रे मागविली आहेत व ती पत्रे आपण पालकमंत्र्यांकडे पाठवून प्रभागनिहाय पायाभूत मूलभूत व नागरी सुविधा तसेच विकासकामे करण्यासाठी निधीची तरतूद (वाटप) पालकमंत्र्यांच्या विचाराने करणार आहात. परंतु, पालकमंत्री या निधीवाटपात पक्षपात करु शकतात. यास्तव या गोष्टीला आमचा तीव्र विरोध असल्याचे माजी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे राज्यात ठाकरे सरकार असताना तत्कालिन पालकमंत्री आदित्य ठाकरे हे महापालिकेतील तत्कालिन शिवसेनेतील नगरसेवकांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी वाटपाचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळेला भाजपसह इतर समाजवादी पक्ष आणि मनसेच्या नगरसेवकाच्या प्रभागात एकाही पैशांच्या निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे ज्या पक्षाच्या पालकमंत्र्यांनी आधी पक्षपात केला आता त्याच माजी पालकमंत्र्यांच्या गटातील माजी नगरसेवकांना पालकमंत्र्यांच्या अधिकारात पक्षपात वाटू लागला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.