मास्क लावा म्हणणारे महापौरच जेव्हा विनामास्क वावरतात, तेव्हा…

प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

यावर्षीची दिवाळी आपण प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी करूया, असे आवाहन मुंबईकर जनतेला करताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे, असे सांगितले. मात्र, महापौरांनी आयोजित केलेल्या सहभोजन कार्यक्रमात स्वत:च मास्क लावला नव्हता आणि शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांनीही मास्क बाजुला ठेवतच या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

स्नेहभोजनाचे आयोजन

दीपावली उत्सवाचे औचित्य साधून महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक तसेच महानगरपालिका वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावतीने बुधवारी भायखळा राणीबागमधील पेंग्विन इमारत येथे स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, खासदार अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते राखी जाधव, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेवक, नगरसेविका, महापालिका अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(हेही वाचा : परमबीर सिंग समोर आले! पण कसे?)

मास्क लावण्याचे आवाहन केले, पण…

यावेळी बोलतांना किशोरी पेडणेकर यांनी यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करून साजरी करायची आहे. यावर्षी ‘माझी वसुंधरा’ अभियानातून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावयाची असून फटाक्यामुळे हवेचे व ध्वनीचे प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घ्यायची आहे. यावर्षीची दिवाळी आपण प्रदूषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी करूया, असे आवाहनही महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकर नागरिकांना केले आहे. तसेच नागरिकांनी मुखपट्टी लावूनच घराबाहेर पडावे, असे आवाहनही महापौरांनी केले आहे.

कुणी मास्क लावला, तर कुणी नाही

मात्र, या प्रसंगी महापौरांनी मास्क लावला नव्हता, तसेच खासदार अरविंद सावंत, माजी सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, तुकाराम शिंदे हे कुणीही मास्क लावून बसले नव्हते. तर व्यासपीठावर उपस्थित अतिरिक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, उपमहापौर सुहास वाडकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्रवादी गटनेत्या राखी जाधव, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षा राज राजेश्वरी रेडकर, सुजाता पाटेकर, दत्ता नरवणकर आदींनी मास्क लावला होता.

महापौरांना मास्कचा विसर पडला

जनतेला आवाहन करताना खुद्द महापौरांनाच आपण मास्क लावला पाहिजे, याचा विसर पडला होता. परंतु मी मास्क लावते, तुम्ही लावा असे आवाहन त्यांना आपल्या सहकारी नगरसेवकांना करावे, असे वाटले नाही. त्यातच आधी आपण मास्क लावायचे नाही आणि जनतेला मास्क लावा म्हणून आवाहन करायचे, हे कुठल्याही जनतेच्या पचनी पडणारे नसून ज्या स्वत: मास्क लावत नाही, त्यांना जनतेला आवाहन करण्याचा काय अधिकार, असा सवालच जनतेकडून होऊ शकतो. त्यामुळे आवाहन करण्यापूर्वी महापौरांनी आपल्यापासून याची सुरुवात करायला हवी, असा सूर जनतेमधून आळवू लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here