नाना पटोले… काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. याच नानांनी थेट मोदींशी पंगा घेत भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला. पण नाना पटोले भाजपचे खासदार असताना त्यांचा फोन टॅप झाल्याची माहिती आता समोर येत आहे. नाना पटोले 2017 साली भाजपचे खासदार असताना त्यांचा फोन टॅप झाल्याचे समोर आले आहे. अमजद खान नावाने हा फोन टॅप झाला असून, त्यांच्यासोबत त्यांच्या चारही सहकाऱ्यांचे देखील फोन टॅप झाल्याचे सांगितले जात आहे.
काय म्हणाले यावर नाना
मी भाजपचा खासदार होतो, त्यावेळी राज्यात कोणाचं सरकार होतं हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येकाला त्यांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य असते. कोणीही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाही. सरकारच्या मान्यतेशिवाय कोणाचे फोन टॅप करता येऊ शकत नाहीत. त्याबाबत सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
(हेही वाचाः अधिकाऱ्यांवरचा अतीविश्वास मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणार का?)
शिवसेनेची मात्र सावध प्रतिक्रिया
दरम्यान त्यावेळी राज्यात शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत होती. त्यामुळे याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांना विचारले असता, शिवसेनेकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली आहे. कुणाचे फोन टॅप करायचे असतील तर तशी रीतसर परवानगी घ्यावी लागते. पण तसे झाले नसेल तर त्याची चौकशी करायला हवी, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Communityनाना त्यावेळी भाजपचे अधिकृत खासदार होते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची अवहेलना होता कामा नये. एका पक्षाने दुसऱ्याच्या पक्षाच्या नेत्याचे किंवा आपल्याच पक्षाच्या नेत्याचे फोन टॅपिंग करू नये. ताबडतोब निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करुन चौकशी करावी. मी नानाभाऊंच्या सोबत आहे. कोणाचाही फोन टॅप होता कामा नये.
-सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते