महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? ‘या’ दोन नावांची चर्चा

197

छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ओढवून घेतलेला वाद शमला असला, तरी आगामी निवडणुकांपूर्वी त्यांना नारळ देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती भाजपाच्या गोटातून समोर येत आहे. त्यांच्या जागी दोन ज्येष्ठ नेत्यांची नावे समोर येत आहेत.

( हेही वाचा : जुन्या पेन्शन योजनेबाबत काय म्हणते केंद्र सरकार?)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात नुकतीच महत्त्वाची बैठक झाली. त्यात महाराष्ट्रासह चार राज्यांच्या राज्यपालांच्या नावांवर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोश्यारी यांच्याजागी लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा झाली.

सुमित्रा महाजन यांनी एका जाहीर कार्यक्रमात, मला महाराष्ट्राचे पाल व्हायला आवडेल, असे विधान केले होते. त्यामुळे बरीच चर्चा रंगली होती. मात्र, येडियुरप्पा यांचे नाव राज्यपाल पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली गेल्या काही वर्षांतली अस्थिरता पाहता, मुरब्बी राजकारणी राज्यपाल पदावर असल्यास फायदा होऊ शकतो. आणि प्राप्त परिस्थितीत येडियुरप्पा त्या योग्यतेच्या रांगेत बसतात. ही बाब हेरून केंद्रीय नेतृत्त्वाकडून त्यांना संधी दिली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

ओम माथूरही स्पर्धेत

भाजपाचे ज्येष्ठ नेते ओम प्रकाश माथूरही महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या स्पर्धेत आहेत. सध्या ते राजस्थानमधून राजसभेचे खासदार आहेत. याआधी राजस्थान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहीलेले माथूर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अत्यंत विश्वासातले मानले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.