मुंबई शहर जिल्ह्याकरिता नवा पालकमंत्री जवळपास निश्चित झाला असताना, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याचा पेच अजूनही कायम आहे. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईक इच्छुक आहेत. पण, त्यांच्याकडे ठाण्याचा कारभार सोपविण्यास एकनाथ शिंदे अनुत्सुक आहेत. त्यामुळे अन्य पर्यायांची चाचपणी सुरू असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
पहिल्या विस्तारानंतर पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना शिंदे-फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे गणित आखले आहे. सद्यस्थितीत केवळ २० जणांचे मंत्रिमंडळ असल्यामुळे काही मंत्र्यांकडे एकाहून अधिक जिल्ह्यांचे पालकत्व देण्यात आले आहे. दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला की त्यांच्याकडील ही अतिरिक्त जबाबदारी काढली जाईल. त्यानुसार, मुंबई शहराला नवीन पालकमंत्री मिळणार असून, दीपक केसरकर यांना या जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे. सदा सरवणकर यांचे नाव त्यासाठी निश्चित मानले जात असून, मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई उपनगराचे पालकमंत्रीपद कायम ठेवले जाणार आहे.
दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या शंभूराजे देसाई यांच्याकडे साताऱ्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांच्याकडचा अतिरिक्त भार काढला जाईल. त्यामुळे ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फारसे सख्य नसल्यामुळे त्यांच्या नावापुढे प्रश्नचिन्ह आहे. किंबहुना त्यांच्या भोवतालचा ईडीचा फेरा अद्याप सुटलेला नसल्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतच साशंकता असल्याचे शिंदे गटातील एका नेत्याने खासगीत सांगितले.
अन्य पर्यायांची चाचपणी
- ठाणे जिल्ह्यात भाजपचे ८ आमदार असल्यामुळे पालकमंत्री पदासाठी फडणवीस आग्रही होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी जोर लावल्यामुळे भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कापला गेला. त्यांच्याकडे तळकोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
- ठाण्यात शिवसेनेचे ५ आमदार आहेत. सरनाईक वगळून अन्य कोणाकडे पालकमंत्रीपद देता येईल का, याची चाचपणी शिंदेंकडून केली जात आहे. त्यात अंबरनाथच्या डॉ. बालाजी किणीकर यांचे नाव आघाडीवर आहे.
- किणीकर यांना राज्यमंत्रीपद दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिंदे गटाला बळ मिळेल. शिवाय श्रीकांत शिंदे यांचा लोकसभेचा मार्ग अधिक सुकर होईल. त्यामुळे त्यांचे नाव अंतिम होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल
- भाजपा – ८
- शिवसेना – ५
- राष्ट्रवादी – २
- समाजवादी – १
- मनसे – १
- अपक्ष – १