सचिन वाझे यांचा पॉलिटिकल बॉस कोण आहे, याचा शोध घ्यायला हवा, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे फक्त प्यादे आहेत, त्यांचा ऑपरेटर कुणी दुसराच आहे, त्याचा शोध घ्यायला हवा, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी थेट शिवसेनेवर आरोप केले.
तेव्हा माझ्यावरही सेनेचा दबाव!
मी मुख्यमंत्री असताना सचिन वाझे यांना सेवेत घेण्याचा दबाव शिवसेनेने टाकला होता. त्यावेळी मी वकिलांचा सल्ला घेईन, असे सांगितले. त्यानंतर वकिलांचा सल्ला आल्यानंतर त्यांच्यावर गंभीर गुन्हे असून, त्यांना सेवेत घेता येणार नाही, असे मी सेनेला सांगितले होते. मात्र 2020 मध्ये शिवसेनेची सत्ता आली, तेव्हा पुन्हा सचिन वाझे यांना सेवेत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर कोरोनाचे नाव समोर करुन, एक रिव्ह्यू कमिटी तयार करण्यात आली. या कमिटीने सांगितले की, कोरोनाकाळात अधिकाऱ्यांची गरज आहे, हे कारण सांगून सचिन वाझे यांना सेवेत घेण्यात आले. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे सचिन वाझे यांच्यासोबत एक-दोन आणखी अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. बाकीच्या कोणालाही सेवेत परत घेतले नाही. सचिन वाझे यांचे एवढे खराब रिपोर्ट असून सुद्धा यांना गुन्हे शाखेत दाखल करण्यात आले. सीआययू विभागाचे प्रमुख म्हणून सचिन वाझे यांना नियुक्त करण्यात आल्याचे सांगत मुंबईतील सर्व हाय प्रोफाईल केसेस सचिन वाझे यांना देण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.
(हेही वाचा : अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी! हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त! )
त्यांना वसुली अधिकारी म्हणून नियुक्त केले!
सचिन वाझे यांना अधिकारी म्हणून नाही तर एक वसुली अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला. वाझे हे मनसुख हिरेन यांना ओळखायचे. वाझे यांनी हिरेन यांच्याकडून एक गाडी खरेदी केली होती. पण पैसे दिले नव्हते. त्यानंतर पैशांची मागणी केल्यानंतर वाझे यांनी हिरेन यांना गाडी वापस केली. त्यानंतर पुन्हा वाझे यांनी ही गाडी परत मागवली. जर गाडीची चोरी झाली असती, तर गाडीचे काहीतरी टॅम्परींग झाले असते दरवाजा उघडलेला असता. पण तसे काहीही झाले नाही. वाझे यांनी गाडी अंबानी यांच्या घरासमोर उभी करायला सांगून चावी आणून देण्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी गाडी चोरी झाल्याची तक्रार देण्याचेही वाझे यांनीच सांगितले. मात्र पोलीस हिरेन यांची तक्रार दाखल करुन घेत नव्हते. यावेळी वाझे यांनी पोलिसांना फोन करुन तक्रार दाखल करण्याचे सांगितल्याचे फडणवीस म्हणाले. मनसुख हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली. दुसऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याने हिरेन यांची चौकशी केली नाही. यावेळी हिरेन यांची चौकशी दुसऱ्या संस्था करु शकतात, हे समजल्यामुळे वाझे हे हिरेन यांना वकिलाकडे घेऊन गेले. तसेच मला अनेकजण त्रास देतात, अनेकजण चौकशी करतात, अशी तक्रार करण्यास सांगितले. यावेळी वाझे यांनी स्व:तचे नाव सुद्धा टाकले, असे देखी फडणवीस म्हणाले.
म्हणून हिरेनचा मृतदेह सापडला
समुद्राला आहोटी आल्यामुळे मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत राहिला. हिरेन यांच्या चेहऱ्यावर रुमाल कसे आढळले. त्यांचा श्वास कोंडला जाईल, अशा पद्धतीने रुमाल बांधले गेले होते. पाण्यात पडून मृत्यू झाला असेल तर त्यांच्या फुप्फुसात पाणी सापडायला हवे होते, असे म्हणत त्यांनी मनसुक हिरेनची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एटीएसने ज्या प्रकाराने कारवाई करायला हवी तशी कारवाई होताना दिसत नाही. पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर पुरावे आहेत. एनआयए आणि एटीएसकडे टेप आहेत. त्यामध्ये हिरेन आणि वाझे यांच्यातील संवाद आहेत. एटीएस सुरुवातीसारखी सक्रिय दिसत नसल्याचे फडणवीस म्हणाले. एटीएसने चौकशीला उशीर केला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएने केला पाहिजे. एटीएसवर अविश्वास नाही, पण त्यांच्यावर दबाव आहे का? त्यांच्याकडून जसा तपास व्हायला हवा, तसा तपास होत नाही, त्यामुळे मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएने करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे सरकारचे अपयश!
हा सर्व प्रकार पोलिसांचे अपयश नसून राज्य सरकारचे अपयश आहे. सचिन वाझे यांना त्या पदावर ज्याअर्थी बसवले त्याअर्थी सरकारची अडचण त्यांना माहिती असावी. या प्रकरणाच्या मुळाशी जायला हवे, ज्या उद्देशाने वाझे यांना त्या पदावर बसवले त्याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.