कोण आहे सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल?

सलीम पटेल आणि सरदार शहा वली खान यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध होते.

115

मुंबईत झालेल्या ९३च्या साखळी बॉम्बस्फोटाची पुन्हा एकदा आठवण करून दिली ती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर ९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपीकडून कवडीमोल दरात जमीन विकत घेतल्याचा आरोप करून मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहा वली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याकडून कवडीमोलात कुर्ला पश्चिम एलबीएस रोड या ठिकाणी असलेली गोवावाला कंपाउंड येथील ३ एकर जागा नवाब मलिक यांच्या मुलाने विकत घेतल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. नवाब मलिक यांचे थेट संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल कोण होते? त्यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध आणि मुंबईत घडलेल्या ९३च्या साखळी बॉम्बस्फोटात त्यांची काय भूमिका होती, हे जाणून घेऊया.

(हेही वाचा : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत नवाब मलिकांचा जमीन व्यवहार)

दोघांचे अंडरवर्ल्डशी संबंध

सरदार शाहवली खान हा कुर्ला पश्चिम गोवावाला कंपाउंड येथे राहणारा असून त्याचे वडील त्या ठिकाणी वॉचमनगिरी करीत होते, तर सलीम पटेल याच्याकडे गोवावाला कंपाउंडची ‘पॉवर ऑफ अटर्नी’ होती. सलीम पटेल हा दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर उर्फ हसीना आपा हिच्याकडे वाहन चालकाची नोकरी करीत असताना त्याचा थेट संबंध अंडरवर्ल्डशी आला होता.

सरदार शहा वली खान भोगतोय जन्मठेपेची शिक्षा 

दाऊद इब्राहिम याने मुंबईत रचलेल्या १९९३ साखळी बॉम्बस्फोटात सलीम पटेल आणि सरदार शहा वली खान यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. सरदार शाहवली खान याने ९३च्या साखळी बॉम्बस्फोटात टायगर मेमनच्या नेतृत्वाखाली अग्नीशस्त्र प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. बॉम्ब ठेवण्याचे ठिकाण, टायगर मेमन याच्या घरात झालेल्या बैठकीत सरदार शाहवली हा सहभागी होता. मेमनच्या माहीम येथील घराजवळ वाहनांमध्ये आरडीएक्स भरणे यामध्ये त्याचा सहभाग होता. सरदार शाहवली खान याला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध साक्षीपुरावे मिळाले होते. त्याच्याविरुद्ध टाडा कायदा लावण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तो सध्या औरंगाबाद येथील हरसुळ तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गेल्यावर्षी त्याने कोविड १९ च्या काळात संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला.

सलीम पटेल होता हसीना पारकरचा विश्वासू

मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल हा दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिचा वाहन चालक म्हणून काम करीत होता. वांद्रे पश्चिम येथे राहणारा सलीम पटेल हा कुर्ला गोवावाला कंपाउंड याची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर होती. सलीम पटेल हा हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमन म्हणून ओळखला जात होता. हसीना पारकर ही सलीम पटेल याला पुढे करून मुंबईतील वादग्रस्त जमिनीवर कब्जा मिळवण्याचे काम करीत होती. मुंबई पोलिसांनी २००७मध्ये हसीना पारकर हिच्यासह सलीम पटेल याला अटक केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.